पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

service rendered by these two officers.” बर्डवूड यांनी केलेले कौतुकच नानासाहेब आणि केशवरावांच्या कष्टाची साक्ष देते. बडोदा लष्करातील अनेक सुधारणांमध्ये नानासाहेब आणि केशवराव सावंत या जोडीने महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. प्रत्यक्ष नोकरीव्यतिरिक्त सयाजीरावांकडून सोपवण्यात आलेल्या अनेक जबाबदाऱ्या दोघांनी पार पाडल्या. खात्यांतर्गत अथवा महाराजांच्या इच्छेने कोणतेही विशेष काम निघाल्यास ते नानासाहेब - केशवराव जोडीकडे सोपवण्याचा रिवाजच पडला होता. शिंदे-सावंतांच्या जोडीने बडोदा लष्करात अनेक सुधारणा करत सरकारचा हजारो रुपयांचा फायदा करून दिला.
कर्मकांडमुक्त व्यक्तिमत्त्व
 पहिल्या पत्नींच्या निधनानंतर मित्रमंडळींनी केलेल्या आग्रहामुळे नानासाहेबांनी फेब्रुवारी १९१३ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तुलासनी गावच्या सुर्वेच्या घराण्यातील मुलगीशी विवाह केला. या मुलीची एक आत्या तंजावरच्या शेवटच्या राजाची राणी होती. रिवाजाप्रमाणे विवाहानंतर दुसऱ्या पत्नीचे राधाबाई असे नामकरण करण्यात आले. कोणत्याही विधींचे स्तोम न माजवता नानासाहेबांनी अत्यंत साधेपणाने हा विवाह केला. आपल्या धार्मिक श्रद्धांविषयी नानासाहेब लिहितात, “मी रोज देवपूजा करीत नसे, किंवा निजताना काही प्रार्थनाही करीत नसे. मी नास्तिक नसून ईश्वर

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ३१