पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे, ही गोष्ट मानणारांपैकी आहे; परंतु नुसत्या मूर्तीची पूजा केली म्हणजे ईश्वर प्रसन्न होतो, असे मानणाऱ्यांपैकी मी नाही. मी केव्हाही ब्राह्मणांच्या पाया पडत नाही. विद्वान असल्यास त्यास नमस्कार करतो. वडील माणसांच्या मात्र पाया पडण्यात माल अभिमान वाटतो. मी केव्हाही उपवास करीत नाही. घरातील मंडळींनी उपवास केल्यास मी त्यास बिलकूल हरकत करीत नाही. त्या दिवशी मीही फराळाचे खातो. माझी दोन्ही कुटुंबे दररोज देवाची पूजा करीत असत, त्यास माझी बिलकूल हरकत नसे. स्त्रियांनी कुलाचार व देवधर्म पाळावा. कुटुंबाने सत्यनारायण केल्यास मी केव्हाही पूजेस बसत नाही. त्यास ब्राह्मण न मिळाल्यास सत्यनारायणाची पोथी वाचून दाखविण्यास माझी केव्हाही हरकत नसते.
 मला बरेच अभंग तोंडपाठ येतात, ते मी नेहमी फुरसतीच्या वेळी मनामध्ये गुणगुणतो, गुरू करून त्यांच्या मागे मी केव्हाही धावलो नाही. हे लोक लुच्चे, लफंगे, भोंदू व ढोंगी असतात, असा माझा अनुभव आहे. जसा ज्योतिषावर माझा भरवसा नाही, तसाच अशा लोकांवरही माझा बिलकूल भरवसा नाही.” नानासाहेबांच्या कर्मकांडमुक्त व्यक्तिमत्त्वाचा वरील आशय महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या व्यक्तिमत्त्वाशी कमालीचा मिळताजुळता आहे.

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ३२