पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीराव महाराजांचे ए.डी.सी.
 १ मे १९१५ रोजी नानासाहेबांची सेकंड लान्सरमधून थर्ड कॅव्हलरीमध्ये मेजरपदी बदली करण्यात आली. या रिसाल्यात नानासाहेब दीड वर्षे कार्यरत होते; परंतु तेथे त्यांचे मन रमले नाही. नानासाहेबांची आधीची उमेद खचून गेली होती. त्यांची ही स्थिती लक्षात आल्यावर सयाजीराव महाराजांनी जानेवारी १९१७ मध्ये नानासाहेबांना सीनिअर ए. डी. सी. म्हणून आपल्या स्टाफवर घेतले.
 सकाळी ९ वाजता सुरू झालेले ए.डी.सी. चे काम दुसऱ्या दिवशी ९ वाजता संपत असे. सकाळी व संध्याकाळी ए.डी. सी. ना महाराजांबरोबर लष्करी गणवेशात बाहेर जावे लागे. रात्री १२ वाजल्यानंतर लष्करी गणवेशात राजमहालाचे पहारे तपासावे लागत, तर दुपारच्या वेळी अंगरखा, पागोटे अथवा फेटा या गणवेशात हजर राहावे लागे. महाराज काम करत असताना किती तास काम चालले याची कल्पना दर तासाला महाराजांना द्यावी लागे. तसेच किरकोळ टिपणे महाराजांना वाचून दाखवावी लागत. सकाळी-संध्याकाळी महाराजांना भेटावयास येणाऱ्या व्यक्तींना सयाजीरावांना भेटवण्याचे कामदेखील त्यांना करावे लागे. सवडीच्या वेळात महाराजांना वर्तमानपत्र वाचून दाखवण्याची आणि अभ्यासाच्या वेळी महाराजांनी टिपून ठेवलेल्या शब्दांचे अर्थ डिक्शनरीमधून लिहून ठेवण्याची जबाबदारीदेखील त्यांना पार पाडावी लागत असे.

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ३३