पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महिन्यातून दोन-तीन वेळा लेफ्टनंट लोकांना ए. डी. सी. पदाचा कार्यभार सांभाळावा लागे. परंतु बरेच अधिकारी कामचुकारपणा करत असल्यामुळे विशेष समारंभावेळी सयाजीराव कार्यतत्पर अधिकाऱ्यांनाच ए.डी.सी. म्हणून सोबत नेत.
 सीनिअर ए. डी. सी. म्हणून नेमणूक होण्यापूर्वी १५ वर्षे १९०२-०३ मध्ये दिल्ली येथे लॉर्ड कर्नल यांनी भरवलेल्या बादशाही दरबाराला सयाजीराव महाराज उपस्थित राहिले. त्यावेळी महाराजांनी सोराबजी, केशवराव सावंत यांच्याबरोबर नानासाहेबांनादेखील ए. डी. सी. म्हणून सोबत नेले होते. तर डिसेंबर १९०३ मध्ये सयाजीरावांच्या द्वारका दौऱ्यावेळी ए.डी. सी. म्हणून नानासाहेब बरोबर गेले होते. विशेष बाब म्हणजे सयाजीराव हे द्वारकेस जाणारे गायकवाड राजवंशातील पहिले महाराज होते.
 या दौऱ्यादरम्यान सयाजीरावांनी घडवून आणलेल्या धर्मसुधारणेची आठवण नानासाहेबांनी आपल्या आत्मचरित्रात नोंदवली आहे. नानासाहेब लिहितात, “येथील गुगळी जातीचे ब्राह्मण फार प्रसिद्ध आहेत. मुख्य द्वारकाधीशाच्या पुजाऱ्याची गुगळी जातीच्या ब्राह्मणांची चार घराणी आहेत. त्यांची वर्षातून प्रत्येकी तीन-तीन महिन्यांप्रमाणे पाळी वाटलेली असून, या मुदतीत देवापुढे दक्षणारूपी जे द्रव्य येते, त्यावर त्यांची मालकी असते. पोशाख अगर दागिना देवास कोणी चढविल्यास तो सार्वजनिक म्हणून जमा केला जातो. हे देवाचे ब्राह्मण,

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ३४