पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिळवणारे नानासाहेब पहिले व्यक्ती होते. १९०४ मध्ये संपन्न झालेल्या युवराज फत्तेसिंगरावांच्या विवाह सोहळ्यातदेखील नानासाहेबांनी केशवरावांसोबत ए. डी. सी. म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ए.डी.सी. ची जबाबदारी पार पाडणाऱ्या अंमलदारांना कामाची नीट माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याचदा चुक होत. त्यामुळे महाराजांना फार त्रास आणि गैरसोय सहन करावी लागत असे. यावर उपाय म्हणून सयाजीरावांनी ए. डी. सी. च्या कामात मार्गदर्शक ठरतील असे नियम तयार करण्याची आज्ञा नानासाहेब आणि केशवरावांना केली. शिंदे-सावंत जोडीने स्वानुभवानुसार नियम तयार करून महाराजांना वाचून दाखवले. ही नियमावली सयाजीरावांना पसंत पडल्यानंतर १९०४ मध्ये 'ए. डी. काँग व त्यांची कर्तव्ये' पुस्तकरूपाने छापण्यात आली. त्यामुळे ए.डी.सी. म्हणून काम करणाऱ्या अंमलदारांना बरीच माहिती मिळून काम करणे सोपे झाले.
 ए.डी.सी. ची नोकरी करणाऱ्या अंमलदारांना कपड्यासाठी अधिकच खर्च करावा लागतो. त्यासाठी या अंमलदारांना भत्ता देण्याची सूचना नानासाहेब व केशवरावांनी महाराजांना केली. त्यानुसार काही दिवसांनी सयाजीरावांनी दरमहा ५० रुपये भत्ता देण्यास मंजुरी दिली. पुढे हा भत्ता १०० रु. करण्यात आला.

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ३६