पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सी. पदी नियुक्ती केली. १९१७ मध्ये नानासाहेबांची ए. डी. सी. म्हणून नियुक्ती केल्यावर त्यांना नवीन अंमलदारांना कामाची व्यवस्थित माहिती देण्याची आज्ञा महाराजांनी केली. परंतु तीनच महिन्यांनंतर कर्नल निसन यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अॅक्टिंग कर्नल पदासाठी जनरल बर्डवूड यांनी नानासाहेबांची शिफारस केली. या शिफारशीनुसार महाराजांनी नानासाहेबांची अॅक्टिंग कर्नलपदी नियुक्ती केली.
कर्नलपदी नियुक्ती

 महाराजांच्या आदेशानुसार १ एप्रिल १९१७ रोजी नानासाहेबांनी कॅव्हलरी ब्रिगेडचा चार्ज घेतला. कर्नल पदाचे काम अतिशय कमी असल्यामुळे मिळालेल्या सवडीचा सदुपयोग करत नानासाहेबांनी सेनापती कचेरीतील संपूर्ण ग्रंथालय वाचून काढले. याउलट त्यांच्याबरोबरचे पलटणीचे कर्नल डिव्हिन कचेरीतील चित्रांचे कॅटलॉग पाहण्यात, चिरूट ओढण्यात आणि टाइम्स ऑफ इंडिया वाचण्यात वेळ घालवीत असत. आपल्याला कचेरीत काहीतरी काम द्यावे असा आग्रह नानासाहेबांनी धरला. अखेर दोन्ही कर्नलांना कोणकोणती कामे द्यावेत यासाठीची एक लेखी योजना नानासाहेबांनी सयाजीराव महाराजांना सादर केली. परंतु दुर्दैवाने महाराजांकडून संमती मिळालेली ही योजना अंमलबजावणीसाठी खात्याकडे आल्यानंतर तिला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. यानंतर मात्र नानासाहेबांनी स्वतःला लेखन-वाचनात गुंतवून घेतले.

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ३८