पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाण्याला वेग जास्त असल्यामुळे पट्टीचा पोहणारा एक शिपाई राजमहालाच्या लोखंडी गजाला जाऊन धडकला. त्या शिपायाने विरोध केल्यामुळे नानासाहेब गेले नाहीत. पहाटे ५ वाजता सर्वत्र फिरून नानासाहेबांनी परिस्थितीचा आढावा घेतला. छातीपर्यंतच्या पाण्यातून लोक लष्करी शिपायांच्या साहाय्याने आपले सामान बाहेर काढत होते. पलटणीचे अंमलदार आणि शिपायांनी केलेल्या मदतीमुळे सुदैवाने एकही व्यक्ती या पुरात दगावली नाही. नानासाहेबांनी सर्व लोकांना धीर देत अन्नपदार्थ वाटण्यासाठी तात्काळ सरकारी मदत उपलब्ध करून दिली.
बडोदा फौजेचे वार्षिक इन्स्पेक्शन
 जनरलपदी कायम झाल्यानंतर नानासाहेबांनी दरवर्षी मार्च महिन्यात फौजेचे वार्षिक इन्स्पेक्शन करण्यास सुरुवात केली. मार्च १९२८ मध्ये होणारे इन्स्पेक्शन स्वतः पाहणार असल्याचा आदेश महाराजांनी दिला. त्यामुळे सयाजीरावांच्या सवडीनुसार आणि सूचनेनुसार इन्स्पेक्शनचे वेळापत्रक तयार करण्यात आले. आठ दिवस सयाजीराव दररोज सकाळी लष्करी गणवेशात तपासणीस सुरुवात करत. फौजेचे इन्स्पेक्शन पूर्ण होताच 'खूश झालेल्या सयाजीराव महाराजांनी नानासाहेबांच्या देखरेखीचे आणि त्यांनी हाताखालील अंमलदारास दिलेल्या प्रशिक्षणाचे कौतुक केले. याचवेळी त्या वर्षीच्या वाढदिवसाच्या दरबारात नानासाहेबांना 'राजरत्न' पदवीचा सोन्याचा चांद

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ४५