पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि केशवराव सावंतांना चांदीचा चांद देण्याची घोषणा सयाजीरावांनी केली. त्याप्रमाणे राजदरबारात राजरत्न किताब देतानाच महाराजांनी नानासाहेबांच्या नोकरीची मुदत एक वर्षांनी वाढवली. विशेष बाब म्हणजे बडोदा फौजेच्या इतिहासात नानासाहेबांच्या आधी कोणत्याही जनरलला हा मान मिळाला नव्हता.
 फौज खात्यातील इन्स्पेक्शनची पद्धत सयाजीराव महाराजांना खूप आवडली. याच पद्धतीने सर्व खात्यांची तपासणी व्हावी यासाठी इन्स्पेक्शन पद्धतीची माहिती इतर खात्यातील अधिकाऱ्यांना देण्याची आज्ञा महाराजांनी नानासाहेबांना दिली. त्यानुसार नानासाहेबांनी इतर खात्यातील अधिकाऱ्यांना तपासणीच्या पद्धतीची माहिती दिली. त्यानंतर सयाजीराव महाराज, दिवाण आणि नायब दिवाणांनी सर्व खात्यांची तपासणी केली. प्रत्येक खात्याच्या तपासणीवेळी नानासाहेब हजर होते. अखेर या तपासणीसाठीचे नियम तयार करण्याची आज्ञा महाराजांनी नानासाहेबांना दिली. नानासाहेबांनी तयार केलेल्या या नियमांची तात्काळ अंमलबजावणी करण्यास सयाजीरावांनी मान्यता दिली.
 १९२९ च्या अखेरीस नानासाहेबांनी वरील मुदत पूर्ण होण्यापूर्वी नोकरीतून निवृत्ती करण्याची विनंती पत्राद्वारे महाराजांना केली. यावर महाराजांनी नानासाहेबांना आणखी एक वर्ष आणि केशवरावांना दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा स्वहस्ताक्षरात आदेश दिला. या आदेशामुळे फौजेतील इतर अंमलदारांमध्ये प्रचंड

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ४६