पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी कर्नल भाऊसाहेब गायकवाड, मेजर रामचंद्रराव चव्हाण, मेजर काद्री आणि लेफ्टनंट युसूफखान या अंमलदारांना सोबत नेले होते. या मनुव्हर्समध्ये नानासाहेबांना लष्करी पेशासंबंधी अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. या अनुभवावर आधारित नानासाहेबांचा 'दिल्लीजवळील लटकी लढाई' नावाचा लेख सहविचार नियतकालिकात प्रसिद्ध झाला.
 मनुव्हर्स संपल्यानंतर २८ ते २९ जानेवारी १९३५ या कालावधीत दिल्लीमध्ये ब्रिटिश भारतातील जंगली प्राणी, पक्षी, मासे आणि वनस्पती यांच्या संवर्धनासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेस नानासाहेब बडोदा संस्थानचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. तर याच वर्षी ६ मे १९३५ रोजी नानासाहेबांना बडोदा राजदरबारात 'दी किंग्ज सिल्व्हर ज्युबिली मेडल' किताबाने सन्मानित करण्यात आले.
नानासाहेबांच्या आठवणीतले महाराजा सयाजीराव
 नानासाहेबांनी बडोदा फौजेत ४१ वर्षे नोकरी केली. लेफ्टनंट पदापासून सुरुवात करून पदोन्नतीने जनरल पदापर्यंत पोहोचलेले नानासाहेब पहिले जनरल होते. आपल्या या कारकिर्दीत त्यांनी बडोद्याचा झालेला कायापालट प्रत्यक्ष अनुभवला होता. सयाजीराव महाराजांच्या काळात बडोद्याच्या झालेल्या विकासाबद्दल नानासाहेब लिहितात, "या चाळीस

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ४८