पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्षांत बडोद्यामध्ये किती तरी मोठे स्थित्यंतर झाले आहे. या सर्व सुधारणांचा उगम एकाच मोठ्या महान विभूतीपासून आहे की, जी विभूती आज पन्नास वर्षे रयतेच्या सुखाकरिता व राज्याच्या सुधारणेकरिता अहर्निश प्रयत्न करीत आहे. महाराज साहेबांनी युरोपच्या २२ स्वाऱ्यांत जे ज्ञान पाश्चात्त्य राष्ट्रांत पैदा केले, त्याचा उपयोग त्यांनी आपल्या राज्यात केला. एका व्यक्तीच्या प्रयत्नाने पूर्वीच्या बजबजपुरीमधून हल्लीचे बडोदे म्हणजे एक नमुनेदार देशी संस्थान पुढे आले आहे. ही गोष्ट लक्षात घेतली म्हणजे त्या महान विभूतीबद्दल सप्रेम व स्वाभिमान कौतुक वाटावे यात नवल नाही. यक्षिणीच्या कांडीप्रमाणे त्यांनी या सुधारणा केल्या आहेत, अशातला प्रकार नाही, तर लोकांस बरोबर घेऊन त्यांच्याकरिता पन्नास वर्षे सारखे खपून त्यांनी या सुधारणा लोकांच्या सुखाकरिता अमलात आणल्या आहेत." नानासाहेबांचे हे मनोगत म्हणजे सयाजीराव महाराजांच्या कर्तृत्वाचा 'जिवंत इतिहास'च आहे.
 सयाजीराव महाराजांसारख्या 'कर्तव्यकठोर'राजाने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यांच्या कौतुकास पात्र ठरेल इतक्या प्रभावीपणे पार पाडत नानासाहेब तब्बल ४१ वर्षे बडोदा लष्करात कार्यरत राहिले. महाराजांच्या वैयक्तिक सेवेतील ए.डी. सी. पदासाठीच्या नियमावलीपासून 'बडोदा डिसिप्लीन अॅक्ट'मध्ये सुधारणा करण्यापर्यंतच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. धारी पलटणीत आमूलाग्र बदल घडवणाऱ्या नानासाहेबांनी लष्करातील सहकार चळवळीचा पहिला 'प्रयोग'

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ४९