पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथसंग्रह केला. विशेष म्हणजे त्यापैकी काही उत्तम लेखक म्हणून 'लौकिक प्राप्त झाले. यापैकी रियासतकार सरदेसाई यांचे उदाहरण पुरेसे बोलके आहे.
 रियासतकारांप्रमाणेच नानासाहेब शिंदे यांचे व्यक्तिमत्त्वसुद्धा सयाजीरावांच्या सहवासात ' बहरले'. त्यातूनच लष्करातील सर्वोच्च असणाऱ्या ‘जनरल' या पदावर नियुक्त होणारे भारतातील कोणत्याही प्रदेशातील ते पहिले भारतीय अधिकारी ठरले. बडोद्यातील साहित्यविषयक चळवळीत संपतराव गायकवाड यांच्याबरोबर नानासाहेब शिंदे यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी एकूण १५ स्वतंत्र ग्रंथांचे लेखनसुद्धा केले. लष्करासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीकडून एवढे लेखन हा अपवाद आहे. ब्रिटिश भारतातील आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील लष्करी अधिकारी आणि मुख्यत: जनरलसारख्या सर्वोच्च पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी तुलना करता नानासाहेबांएवढे ग्रंथ नावावर असणारा एकही लष्करी अधिकारी दिसत नाही. यातच सयाजीरावांच्या नेतृत्वाची आणि नानासाहेबांच्या कर्तृत्वाची प्रचीती येते.
पूर्वपीठिका
 सतराव्या शतकात विजापूर दरबारात सरदार असणाऱ्या शिंदे घराण्याच्या मूळ पुरुषाला त्याने गाजवलेल्या पराक्रमाचे बक्षीस म्हणून आदिलशहाने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण प्रांतात मोठी जहागिरी दिली. या जहागिरीत चिपळूण तालुक्यातील

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ७