पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पेडांबे, कळकवणी, खलपोली, नांदविसे, कोळकवाडी, तिवरे, कादवड, शिरगाव, मोरवणे व रिकटोली या गावांचा समावेश होता. यापैकी पेडांबे व कळकवणी ही गावे वतनाची मूळ जागा मानली जाई. या दहा गावांमधील शिंदे हे 'दसपटीचे शिंदे मोकाशी इनामदार' म्हणून ओळखले जात. या दसपटीच्या जहागिरीची जागा मानले जाणारे पेडांबे हे नानासाहेबांचे मूळ गाव होते.
 पेडांबे येथील पारंपरिक वतने गहाण पडल्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याच्या उद्देशाने नानासाहेबांचे वडील गणपतराव हे ठाण्यास येऊन पोलिसात नोकरी करू लागले. गणपतरावांचे एक मोठे बंधू पेडांव्यास राहून शेती करत लहान बंधू ठाण्यातील कोर्टात नोकरी करत होते. तर नानासाहेबांची आई तळेबीडच्या मोहिते घराण्यातील होती.
 नानासाहेबांचा जन्म १८७५ मध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वाजेगाव येथे मावशीच्या घरी झाला. त्यांच्या जन्माची तारीख अथवा वेळ कोणीच नोंदवून न ठेवल्याने नानासाहेबांना आपली जन्मतारीख आयुष्यभर कळली नाही. तर वडिलांनी जन्मसाल बरोबर सांगितल्याने ते लक्षात राहिल्याचे नानासाहेबांनी नोंदवले आहे. नानासाहेबांचे मूळ नाव दाजीसाहेब असे होते. परंतु त्यांची आत्या त्यांना 'नाना' या नावाने हाक मारत असल्यामुळे पुढे तेच नाव रूढ झाले. नानासाहेब १० वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले.

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ८