पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बालपण
 आईच्या निधनानंतर वडिलांनी नानासाहेब आणि त्यांचे छोटे बंधू रामचंद्र यांना शिक्षणासाठी सुपे येथील आपल्या मुलीकडे पाठवले. निरक्षर वडिलांची प्रेरणा आणि त्यांची कथा-कीर्तने ऐकण्याची आवड यामुळे नानासाहेबांनी १३ वर्षाचे होईपर्यंत बरेच प्राकृत ग्रंथ वाचले होते. सुप्यात काही काळ शिक्षण घेतल्यानंतर नानासाहेबांचे वडील आपल्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी भिवंडीला घेऊ गेले. त्यावेळी नानासाहेब सहावीमध्ये शिकत होते. सहावीच्या वर्गात ते एकटेच मराठा विद्यार्थी होते. इतर सर्व विद्यार्थी ब्राह्मण-प्रभू जातीचे आणि त्यांच्यापेक्षा वयाने मोठे होते. नानासाहेबांचा मराठी भाषा, व्याकरण, गणित, इतिहास व भूगोल या विषयांचा अभ्यास चांगला होता. यावेळी बरेच ब्राह्मण विद्यार्थी गणित शिकण्यासाठी आपल्या घरी येत असल्याची आठवण नानासाहेबांनी आपल्या आत्मचरित्रात नोंदवली आहे.
 मार्च १८८९ मध्ये मोठ्या बहिणीचे दीर सदाशिवराव भिवंडीला आले असता त्यांनी इंग्रजी शिकण्यासाठी स्वतः बरोबर बडोद्यास येण्याबाबत नानासाहेबांना विचारले. मोठ्या बहिणीचे पती बाबूराव चव्हाण हे बडोद्याच्या सर्व्हे खात्यात नोकरीस होते. तर सदाशिवराव मॅट्रिकच्या परीक्षेचा अभ्यास करत होते. त्यांच्या वडिलांची परवानगी मिळाल्यानंतर सदाशिवराव नानासाहेबांना घेऊन बडोद्यास गेले.

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ९