हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्थितीत आपण कार्ये घेऊन समाजरचना करू शकू, या गोष्टी व्यर्थ होत. जर आपण सारी शक्ती लावून अगर साऱ्या लहानसहान गोष्टी बाजूला सारून, आपल्या पद्धतीने तेजस्वी, प्रतिष्ठासंपन्न, प्रभावी व व्यापक कार्याची उभारणी शीघ्रातिशीघ्र केली नाही तर मी निश्चयपूर्वक आपल्याला सांगतो की, वुई हॅव नो फ्यूचर, ऍब्सोल्युटली नो फ्यूचर... अर्थात् आपणास भविष्यकाळ नाही...मुळीच नाही ! इतर प्रांतातूनही मी हेच सांगत आलो आहे व आपणालाही हेच सांगू इच्छितो." (श्रीगुरुजी समग्र दर्शन, खंड - दोन)

 आता ४९-५० सालासारखी स्थिती राहिलेली नाही. संघकार्य वाढतच गेले व जसजसे ते वाढले तसतसा संघाने समाजसेवेच्या 'अन्यान्य' क्षेत्रातही प्रवेश केला व त्यावर आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उठवला. कुठे गोंडा जिल्हा प्रकल्प आहे, कुठे कन्याकुमारीचे विवेकानंद केंद्र आहे. आदिवासी क्षेत्रात कल्याण आश्रमासारखी संस्था कार्य करीत आहे. रायपूरजवळ चांपा येथे एक महारोग निवारण केंद्रही चालू आहे. गोंडा जिल्हा प्रकल्पाच्या धर्तीवर महाराष्ट्रात काम उभे करावे असा काही मंडळींचा विचार आहे व मागासलेला बीड जिल्हा त्यांना खुणावत आहे. असे चहूदिशांनी, चहुबाजूंनी संघकार्य फोफावते आहे, वाढते आहे. वटवृक्ष विस्तारतो आहे. हा विस्तार मुळ संघकार्यावर, म्हणजे दैनंदिन शाखांवर, तेथे घडणाऱ्या राष्ट्रभक्तीच्या संस्कारांवर अवलंबून आहे, हे उघड आहे. हे मूळ हरवले, तर रा स्व. संघाची, काँग्रेस किंवा सर्वोदयवाद्यांचा सर्व सेवा संघ होण्यास कितीसा वेळ लागणार? 'अन्यान्य' क्षेत्रातील कार्य उभे राहिले तरी ते वाढविण्यासाठी, नवनवीन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी, चारित्र्यसंपन्न कार्यकर्त्यांचा पुरवठा सतत व्हावा लागणारच. हे कार्यकर्ते घडविण्याचे, व्यक्तिगत व सार्वजनिक चारित्र्यनिर्मितीचे कार्य संघशाखा देशभर करीत आहेत. हे मूलभूत कार्य आहे. हे भक्कम असेल तर गोंडा जिल्हा प्रकल्पासारखी विकासकार्ये हा हा म्हणता उभी राहू शकतात. हे मूलभूत कार्य महाराष्ट्रात किती प्रमाणात पूर्ण झाले आहे? पुण्याला उपरोक्त काळात होणाऱ्या संघशिबिरावरून त्याची थोडीफार कल्पना सर्वांना येऊ शकेल. पूर्वी खेडेगावात शेकडा एक व शहरभागात शेकडा तीन टक्के कार्यकर्ते हवेत असे गणित संघात मांडले जाई. मर्यादा गाठायची तर अजूनही संघाला खूपच वाटचाल केली पाहिजे. ही वाटचाल लवकर पूर्ण होवो व 'बलसागर भारत' उभा करण्याचे संघस्वप्न लवकर साकार होवो !

जानेवारी १९८३

।। बलसागर ।। १२१