हे पान प्रमाणित केलेले आहे.

 इथेच नेत्यांच्या वैयक्तिक गुणावगुणांपेक्षा त्यांच्या मागच्या सामाजिक शक्तींचा मागोवा घेण्याची गरज भासू लागते. कारण गांधी, नेहरू जसे फाळणीच्या भवितव्यतेला अगतिकपणे शरण गेले, तसेच देशातील इतर पक्ष, त्यांचे नेते व अनुयायी, या सर्वांना फाळणी अमान्य असूनही, कोणीही तिच्याविरुद्ध ब्र काढला नाही, ही वस्तुस्थिति आहे. देशात त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाची क्रांतिकारक संघटना होती; अखंड भारताचा उद्घोष करणा-या हिंदुत्वनिष्ठ संघटनाही चांगल्याच जोरावल्या होत्या. मग यांपैकी कोणी फाळणीविरुद्ध आवाज उठवू नये, आंदोलने, सत्याग्रह, सशस्त्र प्रतिकार इत्यादी मार्गांनी आपला विरोध व्यक्त करू नये, याचा अर्थ काय ? आमचे बेचाळीसचे क्रांतिवीर आणि प्रतिसरकारांचे संस्थापक त्यावेळी कोठे होते ? काँग्रेस नेत्यांच्या अगतिक शरणागतीएवढीच काँग्रेसेतर संघटनांची ही निष्क्रीयताही दोषास्पद नाही का ?
 तसे पाहिले, तर स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी आपल्या देशासमोर काही जगावेगळी भयंकर संकटे उभी होती असे म्हणवत नाही. आफ्रिकेतील नवस्वतंत्र राष्ट्रांना कोणत्या दिव्यातून पार पडावे लागत आहे ते आपण आज पाहतच आहोत. एवढासा चिमुकला अल्जेरिया ! जगाच्या इतिहासात तोड नाही एवढा प्रखर व रक्तरंजित स्वातंत्र्य संग्राम या शूर देशाने लढवला ! पण स्वातंत्र्यप्राप्तीच्या ऐन क्षणीच

यादवीयुद्धाचे सांवट त्यावर पसरले गेले. इतके की, आपला पहिलावहिला स्वातंत्र्योत्सवही बिनघोरपणे या देशाच्या नागरिकांना साजरा करता आला नाही. आठ दिवस साजरा होणारा विजयोत्सव दुसऱ्याच दिवशी बंद ठेवावा लागला. आणि एकदा स्वातंत्र्य मिळाल्यावर पुढेही अशा तऱ्हेची संकटे देशासमोर येत नाहीत असे थोडेच आहे ? शंभर वर्षे स्वातंत्र्याचा उपभोग घेणा-या अमेरिकेसमोर १८६७ साली अंतर्गत यादवीचे अरिष्ट उभे राहिलेच ना ? त्यावेळी दक्षिणेकडील संस्थानांच्या बंडाळीला शरण जाऊन अमेरिकेची फाळणी करण्यात आली असती, तर आजची अमेरिका जगाला दिसली असती काय ? जो विवेक जे धैर्य लिंकन दाखवू शकला, ते, आमचे गांधी, नेहरू का दाखवू शकले नाहीत असा प्रश्न आहे. कायदेआझमांनी पिस्तुल चालवण्याची धमकी दिली. प्रत्यक्षात कलकत्त्याचे हत्याकांड पेटवून आपण काय करू शकतो याचे प्रात्यक्षिकही त्यांनी काँग्रेसनेत्यांसमोर ठेवले. पंजाबमधील परिस्थिती तर इतकी भयानक होती की, ती पाहून पंडितजी हतबलच झाले व पंजाबची फाळणी मागण्याशिवाय त्यांना काही पर्यायच सुचला नाही. एकदा पंजाबची फाळणी मागितल्यावर त्याच नात्याने देशाची फाळणी त्यांच्या-काँग्रेसच्या-गळ्यात बांधणे जिना-माउंटबॅटन यांना मुळीच जड गेले नाही. एवढ्या घिसाडघाईने व तडकाफडकी हे चिरफाडीचे काम उरकण्यात आले की, साधा शिंपीदेखील एखादा सूट बेतून

।। बलसागर ।।२