हे पान प्रमाणित केलेले आहे.

संपत्ती ‘मुस्लिम ब्रदरहुड'साठी उपलब्ध आहे. मुळातच आक्रमक आणि विजिगीषु असलेल्या इस्लामधर्माला आता एका नव्या जगज्जेतृत्वाच्या आकांक्षेने फुलवलेले आहे; हिरवा चाँद पुन्हा जगावर फडकवण्याची स्वप्ने इस्लामधर्मियांच्या डोळ्यांसमोर तरळू लागलेली आहेत. महंमद पैगंबरांनंतरचा इतिहास थोडा चाळून बघावा; शंभर-सव्वाशे वर्षांतच आफ्रिकेचा किनारा व्यापून, युरोपात स्पेनपर्यंत इस्लामने धडक मारली होती आणि इकडे, पूर्वेच्या बाजूला, महंमद विन कासमच्या अरबी घोड्यांनी सिंध प्रांत आपल्या टापांखाली आणायला सुरुवात केली होती. पुन्हा ते विजयपर्व लिहिण्याची, तसा पराक्रम गाजवण्याची महत्त्वाकांक्षा इस्लामी अंत:करणात जागृत झालेली आहे आणि पश्चिमेचे ज्ञानविज्ञान, तेलाचा अमाप पैसा आणि कधीही विचलित न होणारी धर्मश्रद्धा, यांच्या बळावर ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करून घेण्याची क्षमताही आता इस्लाम बाळगून आहे. असा एक आक्रमक पवित्रा जगभरच्या इस्लामने घेतलेला असताना पाकिस्तानसारखे भारताच्या उरावर बसवून ठेवलेले राष्ट्र कोलमडू दिले जाईल, इतर इस्लामधर्मी राष्ट्रे किंवा अमेरिकेसारखी महासत्ता ते घडू देतील, यावर तारीक अलीसारखा विश्वास ठेवणे कठीण आहे. पाकिस्तान कोलमडणे चांगलेच आहे; पण तेथे चीन-अमेरिका किंवा एखादा खोमेनी ठाण मांडायला येणार असतील तर त्या कोलमडण्याचा आपल्याला उपयोग काय, हाही प्रश्नच आहे. भारतानेच खैबरपर्यंत आपले प्रभावक्षेत्र विस्तारायला हवे. खैबर हाती नाही तोवर दिल्लीही सुरक्षित नाही, हे जुन्या काळापासून मान्य झालेले ऐतिहासिक भौगोलिक सत्य आहे व आज नाही उद्या या सत्याचा स्वीकार भारतीय राजनीतीला करावा लागणार आहे. उगाच नाही मोगल बादशाह, स्वत: मुसलमान असूनही, मध्यपूर्वेतील टोळधाडींना अफगाणिस्तानच्या सीमेवर अडवून ठेवण्यासाठी सतत तिकडे सैन्य पाठवित राहिले, आणि नंतर आलेल्या ब्रिटिशांनीही, रशियाला खैबरपलीकडे रोखून ठेवण्यासाठी, एक नाही, दोन नाही, तीन अफगाण युद्धे भारतावर लादली होती ! पाकिस्तानद्वारा संपूर्ण भारतीय उपखंडावर सतत दाब ठेवता येतो म्हणून जगातल्या महासत्ता आणि उदयास येत असलेला नवा मुस्लिम साम्राज्यवाद पाकिस्तानच्या रक्षणासाठी सदैव सिद्धच असेल ! एखादे भारत-पाक युद्ध होईल-जसे ते यापूर्वीच्या प्रत्येक दशकात झाले आहे. एखाद्या युद्धात आपल्याला जयही मिळेल-जसा तो बंगलादेश युद्धात मिळाला होता; पण पाकिस्तान नष्ट होण्याची शक्यता या दशकात तरी कमीच ! त्यासाठी भारत स्वावलंबी, समर्थ व एकात्म व्हायला हवा. मुस्लिम अनुनयाचा काँग्रेसी वारसा झिडकारून देणारी सत्ता दिल्लीत असायला हवी. इथल्या मुसलमानांना भारत हीच आपली पितृभू आणि पुण्यभूही वाटायला हवी. हिंदूनाही आपल्यातली सामाजिक विषमतेची दरी बुजवण्यात यश यायला हवे. हे

।। बलसागर ।। ७४