हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याला विचारले, 'तुम्हाला हिंदू व्हावे असे का वाटते ?' तो म्हणाला, ‘ख्रिस्ती धर्माने माझे समाधान झाले नाही, माझी अध्यात्मिक भूक शमली नाही.' यावर शंकराचार्य म्हणाले, 'आपण ख्रिस्ती धर्माचे खरोखरच प्रामाणिकपणे पालन केले आहे काय ? प्रथम तसा प्रयत्न करून पहा. इतके करूनही तुमचे समाधान झाले नाही, तर मग माझ्याकडे अवश्य या !' आमचा दृष्टिकोन हा असा आहे. इतरांना आपल्या धर्मात ओढण्याचा प्रकार हिंदुधर्माला मान्य नाही. धर्मातर हे प्राय: राजकीय वा तत्सम अन्य लाभाच्या हेतूने करण्यात येते. आम्ही ते निषिद्ध मानतो. आम्ही म्हणतो, सत्य हे असे आहे. पटत असेल तर त्या मार्गाने चला !" ( विचारधन, दुसरी आवृत्ती, पृष्ठ ४४१ ) ही अशी हिंदुधर्माच्या गाभ्याची धारणा असल्याने एखाद्या संप्रदायात तो बद्ध करून त्याला संकुचित करणे किंवा केवळ तात्कालिक, किंवा- प्रतिक्रियात्मक पातळीवर त्याचा विचार करणे उचित नाही. पूर्वीसारखी उदासीनता, न्यूनगंडही नको. खोटा, पोकळ अहंभाव आणि दुराभिमानही नको. समुद्राने महासमुद्र व्हावे नद्या पुष्कळ आहेत. !

सप्टेंबर १९८१

।। बलसागर ।। ८६