पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/112

हे पान प्रमाणित केलेले आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान निघणार आहे; अंधश्रद्धेकडे जाऊन नाही.
 भविष्य मागे नाही, पुढे आहे
 शेती तंत्रज्ञानाची पुढील दिशा कशी असेल? मी एक विज्ञानकथांतल्या प्रमाणे स्वप्नरम्य कल्पना मांडतो. त्याने कल्पना स्पष्ट होईल. रसायनांचा जमिनीवर, पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो तो असंतुलित आणि वारेमाप वापराने. झाडांना गरज असते एक कणाची, आपण फवारतो दहा मण. दोष रसायनांचा नाही, अतिरेकी वापराचा आहे. वारेमाप वापर होतो, कारण झाडाची नेमकी गरज काय हे आम्हाला समजत नाही. अवकाश संशोधनाने आज हे तंत्रज्ञान माणसाला उपलब्ध होते आहे. झाडाला नेमकी पोषक द्रव्ये कोणती हवी, औषधांचा डोस किती हवा याचे अचूक मोजमाप गणकयंत्रावर मिळाले तर रसायनांची पुष्कळशी नासधूस उधळपट्टी थांबेल आणि रासायनिक शेतीचे भयानक परिणाम पुष्कळसे सुसह्य होतील.
 या पलीकडे जाऊन वनस्पतींना पोषकद्रव्ये आणि औषधे नेमक्या आणि मोजक्या प्रमाणात देण्याची काही युक्ती सापडली तर माझी खात्री आहे, येत्या पंधरा-वीस वर्षांत एका काळी शेतकरी झाडांवर औषधांचा फवारा मारून झाडे न्हाऊन काढत होता या कल्पनेने लोकांना हसू येईल. माणसाला गोळ्यांनी, सुई टोचून किंवा शिरेवाटे सर्व पदार्थ पोचवता येतात तशी काही युक्ती वनस्पतींच्या बाबतीत शोधली गेली तर कदाचित एका गावात वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर सर्व देशाची शेती होऊ शकेल. रसायनांच्या भयानक परिणामांवर तोड अशा वैज्ञानिक प्रगतीने निघेल, जुन्या काळात परत जाऊन नाही.
 रसायनांचा असंतुलित व अतिरेकी वापर हा जमिनीकरिता विनाशकारक, शेतकऱ्याला तोटा देणारा आणि ग्राहकालाही अनिष्ट ही गोष्ट खरी; पण याचा अर्थ शेतकऱ्यांनी स्वयंभू किंवा स्वावलंबी खेड्यांमध्ये बिगरव्यापारी शेतीकडे वळायचे आहे, असे नाही.
 इतिहासाच्या निर्णायक पायरीवर शेतकरी

 तीन हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला ; शेतकऱ्यांच्या खळ्यावर धान्याची रास जमू लागली; पोटापाण्याच्या दंडबेड्यांतून मनुष्यप्राण्याची सुटका होईल आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी, 'स्वातंत्र्याच्या कक्षा' विस्तारण्यासाठी तो मोकळा होईल अशी अशा वाटत होती, ती आशा खोटी ठरली. शेतीतील वरकड उत्पन्नाची लूट चालू झाली ती आजतागायत चालू

बळिचे राज्य येणार आहे / ११४