पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/113

हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहिली. लुटारू आले, राजेमहाराजे आले, सावकार, जमीनदार आले, गोरे इंग्रज आले, काळे इंग्रज आले, शेतीची लूट चालू राहिली. शेतीच्या लुटीचे युग संपत आले आहे. मॉस्कोचा पाडाव झाला आहे. नेहरूवाद मिटला आहे. जगभर व्यक्तिगत आर्थिक प्रेरणांचे महत्त्व मानले जात आहे.
 सर्वसामान्यांना काही समजत नाही; आम्ही दुढ्ढाचार्य सांगू त्याप्रमाणे त्यांनी करावे; त्यातच त्यांचे कल्याण आहे असे उद्घोषणाऱ्या 'प्रेषितां'चा पराभव झाला आहे. नियोजन मंडळात नाही, बाजारपेठेतच सर्वोत्तम निर्णय होतात. छोटी छोटी माणसे आपापल्या कच्च्याबच्च्यांच्याकरिता धडपड करता करता साऱ्या जगाचे कल्याण साधतात. ब्रह्माचे हित आणि पिंडाचे हित एकच आहे, त्यांत तफावत नाही या अद्वैताचा विजय होतो आहे.
 हिंदुस्थानातही एक नवा शेतकरी उदयाला येतो आहे. शेती ही त्याची जीवनशैली नाही; त्याचा व्यवसाय आहे. तो केवळ शेतकरी नाही; व्यापारीही नाही; तो सर्वार्थाने उद्योजक आहे. डोळे सताड उघडे ठेवून तो आपली उद्योजकता गाजवणार आहे. रासायनिक शेतीचे त्याला प्रेम नाही. तिला घाबरून धर्मवादी, समाजवादी, पर्यावरणवादी आणि इतर हौसे गवसे नवसे यांच्या कच्छपिला तो जाणार नाही. त्याचा शोध विज्ञानाचा असेल, त्याचे निष्कर्ष प्रयोगाने ठरतील. उद्योजक शेतकऱ्याची शेती विज्ञानशेती असेल. जगभर विज्ञान, विशेषत: जैविकशास्त्रे हनुमान झेपा घेत उंचावत आहे. उद्योजक शेतकऱ्याचा आधार हे विज्ञान आहे. निसर्गशेती, जैविक शेती, पर्यावरण शेती इत्यादी इत्यादी पद्धती विज्ञान स्वीकारतील आणि अर्थकारण मानतील तितक्याच प्रमाणात उद्याच्या उद्योजक शेतकऱ्याला मान्य होतील अन्यथा नाही.

(शेतकरी संघटक, २१ एप्रिल १९९४)

बळिचे राज्य येणार आहे / ११५