पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/118

हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रश्न केला आणि बरेचसे आढेवेढे घेऊन का होईना त्यांनी सांस्कृतिक वारशापोटी गायीची भलावण करत असल्याची कबुली दिली.
 सर्वच जनावरे उपयुक्त पशू असतात; गाय हा विशेष उपयुक्त पशू. गाईच्या चेहऱ्यावरील अभिव्यक्ती आणि पाणीदार डोळ्यांतील भावना मानवी अभिव्यक्तीशी अधिक जुळणाऱ्या. तिचे दूध मनुष्यप्राण्याच्या बाळांना सहज मानवते. हे सगळे खरे असले तरी जगातील सर्व देशांत गायीविषयी भावनिक जवळीक फारशी नाही. फ्रेंच भाषेत कोण्या स्त्रीला गायीची उपमा देणे हेटाळणीदाखलच होते.
 सहृदयतेच्या कारणाने किंवा अगदी अर्थशास्त्राच्या आधाराने कोणत्याही प्राण्याचा वध करू नये असे मांडता येईल; पण व्यवहारी हिशेबापोटी असावे, अगदी गांधीवादीसुद्धा अहिंसेचा आग्रह धरताना सर्व पशुंच्या कत्तलीवर बंदी घालावी अशी मागणी करण्याचे धाष्टर्य करीत नाहीत. त्यांची करुणा गायीपुरतीच मर्यादित राहते!
 विज्ञानाचा किंवा अर्थशास्त्राचा आधार गोवंश रक्षणासाठी आवश्यक आहे असे मला वाटत नाही. मनुष्य, व्यक्ती काय किंवा समाज काय, सर्वच काही शुद्ध तर्काने चालत नाहीत. विज्ञानाच्या शिखरावर पोहोचलेली राष्ट्रे पंख असलेले घोडे आणि शिंग असलेले सिंह आपल्या राजमुद्रांवर मिरवतात. गायीविषयीचा पूज्यभाव सर्वसाधारण समाजात आहे, एवढे पुरे आहे. कोणतीच पूज्य भावना विचक्षणेस उतरू शकत नाही. गायीच्याच बाबतीत अशी विचक्षणा का करा ? सर्वसामान्य समाजाला गाय मारली जाऊ नये असे वाटत असेल तर तसा कायदा करण्याचा त्यांना अधिकार आहे, गायीच्या श्वासात प्राणवायू आहे आणि प्रत्येक गाय 'कामधेनू'च असते असला अवास्तव कांगावा करण्याची काहीच आवश्यकता नाही.
 गायीविषयी प्रेम, आदर आणि करुणा भारतीय साहित्यात पूर्वापार आढळते. याउलट, बैल यज्ञयागात बळी देण्याची प्रथा वेदकालीन आहे आणि बळी दिलेल्या बैलांचे मांस हे ऋत्विजांचे शास्त्रोक्त खाद्य आहे. गोरक्षणाची परंपरा आहे तशी बैल आणि वळू यांच्या रक्षणाची परंपरा भारतीय इतिहासात नाही; पण आधुनिक हिंदुत्वावाद्यांना त्यासाठी आवश्यक ते जनसमर्थन आहे असं वाटत असल्यास त्यांना कोण आणि कसे थांबवणार?

 गायींचे संवर्धन आणि त्यांचे रक्षण यावर पुष्कळसे काव्य मी ऐकले होते. मध्य प्रदेशातील छत्तरपूर मुक्कामी गांधी स्मारक आश्रमात मुक्कामास असताना

बळिचे राज्य येणार आहे / १२०