पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/130

हे पान प्रमाणित केलेले आहे.

बोंडअळीला प्रतिकार करणाचा गुणधर्म या वाणात येतो तो घटक साध्या कापसाच्या बियाणाच्या जनुकामध्ये त्यातील संबंधित घटकाऐवजी घालून नवीन बियाणे विकसित केले. हे बियाणे असे तयार झाले की त्यापासून तयार होणाऱ्या रोपांची पानेच बोंडअळीला मारक ठरतात आणि परिणामी फारशी औषधे फवारावी न लागताच पीकसंरक्षण होते.
 मी जागतिक कृषी संघटनेच्या चर्चासत्राला गेलो होतो तेथे दोन नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ हजर होते. त्यांनी जैविक तंत्रज्ञानाचे जे भावी चित्र समोर ठेवले त्यावरून असे दिसते की जनुकांतील अशा तऱ्हेच्या बदलांच्या साहाय्याने शेतकऱ्यांच्या हाती बियाणी येऊ लागली तर सध्याची बरीचशी कारखानदारी अनावश्यक ठरेल. कारण, वाणांतल्या जैविक बदलाने आजच्या कारखानदारी मालांची उपयुक्तता थेट शेतीउत्पादनातच निर्माण होऊ शकेल. येत्या शतकात जैविक शास्त्राची प्रगती इतकी होईल की कोणाही माणसाला आजारपण घालविण्यासाठी डॉक्टरकडे जाऊन औषध घेण्याची गरज राहणार नाही, शेतीतून मिळणारे अन्नच त्याच्यापासून रोगांना दूर ठेवेल.
 जैविकशास्त्राच्या या झेपेमुळे ज्यांचे हितसंबंध धोक्यात आले आहेत त्यांनी या शास्त्राविरुद्ध काही लोकांना उभे केले आहे. बोलगार्ड या कापसाच्या बोंडअळी प्रतिकारक बियाण्यांच्या आंध्र आणि कर्नाटकातील प्रायोगिक शेतीवर जाऊन या लोकांनी तेथील रोपे उपटून टाकायला सुरुवात केली; पण तेथील शेतकरी जागरूक होते, त्यांनी दुसऱ्या दिवसापासून आपल्या शेतांचे संरक्षण स्वतः करायला सुरुवात केली. दुदैवाने, शेतकऱ्यांच्या फायद्याच्या या तंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या लोकांना डॉ. नंजुंडस्वामींसारख्या शेतकरी नेत्याचे नेतृत्व लाभले आहे.

 आपली शेतकरी संघटनेची भूमिका काय आहे? हे जे काही नवीन तंत्रज्ञान आहे ते कदाचित नुकसान करणारे असेलही; त्याचे काही वाईट परिणाम असतीलही. विरोध करणारी मंडळी कधी कधी अगदी मूर्खासारखा युक्तिवाद करतात. ते म्हणतात, 'बोंडअळीला प्रतिकार करण्यासाठी कपाशीच्या वाणातील जनुकातला एक घटक बदलला तर त्याच्या संपर्कानेसुद्धा, नको असताना, दुसऱ्या पिकाच्या वाणात तो गुणधर्म जाईल' अशा तऱ्हेचे आचरट युक्तिवाद करून, शेतकऱ्यांच्या हाती आर्थिक सत्ता जाण्याला फक्त ज्यांचा विरोध आहे त्यांनी जो प्रचार चालविला आहे. त्यांच्याविरुद्ध उभे राहणे ही शेतकरी संघटनेची भूमिका आहे. कोणतीही नवीन गोष्ट आली तेव्हा तिला

बळिचे राज्य येणार आहे / १३२