पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/134

हे पान प्रमाणित केलेले आहे.

'आम आदमी' अर्थशास्त्राच्या नावाखाली राबवली जात आहे एवढेच नव्हे तर ती अत्यंत लोकप्रिय होत आहे. 'आम आदमी'वाद निवडणुका जिंकण्याचे हुकमी साधन झाले आहे.
 ज्या शेतकरी समाजाच्या हाती रास्ता रोको, रेल रोको, ठिय्या अशी आंदोलनाची अनेक साधने देऊन लढण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला; त्या समाजातील शेतकऱ्यांनी गेल्या २५ वर्षांत दररोज वीस ते तीसच्या संख्येने आत्महत्या केल्या.
 शेतकरी संघटनेच्या 'नैतिक दर्शना'त उद्योजकतेला मोठे स्थान आहे. १९९१ नंतरच्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या काळात देशी उद्योजकांनी मोठी भरारी मारली. पण, तापमानवाढ, हवामानातील बदल यांमुळे सर्व उद्योजकतेवरच मोठे आक्षेप उठत आहेत. उद्योजकतेनेच घात केला, उद्योजकतेनेच पृथ्वी बुडायला आली अशा पर्यावरणवादी विचारालाही जागतिक मान्यता मिळते आहे.
 बायबलच्या 'जुन्या करारा'तील जगाच्या निर्मितीसंबंधी मांडलेल्या सिद्धांताच्या आधाराने पर्यावरणवादी प्रतिभा, संशोधन आणि धाडस या गुणांना महापाप मानू लागले आहेत.
 आर्थिक मंदी हटविण्याकरिता पुरुषार्थाला आवाहन करण्याऐवजी अंत्योदयाच्या करुणावादाला जोपासले जात आहे.
 जी काय थोडीफार वर्षे जगायला मिळेल त्या काळात गुणवत्ता आणि पुरुषार्थ सांगणारा विचार पुढे येण्याची काहीही शक्यता दिसत नाही.
 अलीकडे महाराष्ट्राच्या पन्नासाव्या वर्धापनदिनानिमित्त एका मान्यवर वाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात एका प्रथितयश संपादकांनी १९८० सालाच्या काळाचा उल्लेख करताना त्यावेळी देशाचा पहिला शेतकरी पंतप्रधान शरद जोशीच होतील अशी सर्वदूर भावना असल्याची आठवण केली होती. १९८० सालापासून शेतकरी संघटनेच्या बांधणीमध्ये, कार्यक्रमांत किंवा विचारात अशा काय चुका झाल्या की आजची निराशाजनक परिस्थिती तयार व्हावी याचा ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने ऊहापोह करण्याचे योजिले आहे.

 गेल्या ७४ वर्षांतील शेवटची ३२ वर्षे स्वित्झर्लंडहून परत आल्यानंतर हिंदुस्थानात गेली. त्यांतील जवळपास ३० वर्षे शेतकरी संघटना आणि शेतकरी आंदोलन यांत गेली.

बळिचे राज्य येणार आहे / १३६