पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/142

हे पान प्रमाणित केलेले आहे.

केली जाते. परिस्थितीनुसार त्या पक्षाला बोचेल असे काही संघटनेस करावे लागले की तीच माणसे संघटनेच्या विरुद्ध हाकाटी करू लागतात. १९८९ आणि ९० च्या निवडणुकांत संघटना किती खऱ्या अर्थाने राजकारणात निर्लेप आहे हे दिसून आले. पण राजकीय पक्षांची जवळीक ही आंदोलनाच्या सोयीसवडीनुसार ठरायची असते हे सूत्र पचविणे बहुतेकांना फार जड गेले.
 संघटनेचे कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणावर थकले आहेत हे मान्य करण्यात कमीपणा कोणताही नाही. म. गांधींनी मोठी आंदोलने १० वर्षांच्या अंतरा अंतराने केली. पोलिसांची लाठी आणि बंदूक यांचे थैमान डोळ्यांनी एकदा पाहिले की त्यानंतर पुन्हा मोकळ्या हाताने सत्याग्रहासाठी जायला मन सहसा तयार होत नाही. संघटनेच्या सर्व प्रसाराचा आणि व्यापाचा शारीरिक आणि आर्थिक बोजा १० वर्षे कार्यकर्त्यांनी सतत सहन केला. कार्यकर्ते स्वातंत्र्ययुद्धाच्या उंबरठ्यावरच थकले भागलेले होते ही गोष्ट खरी.

 नांदेडच्या कार्यक्रमास मिळालेला प्रतिसाद खऱ्या अर्थाने पाहिले तर अगदी तुटपुंजा होता. जातीयवाद्यांना गावबंदी करण्याच्या पाट्या किती गावांवर लागल्या? दारूची दुकाने बंद करण्याचे सत्याग्रह अनेक ठिकाणी झाले; पण महाराष्ट्रात त्याचे वादळ बनले नाही. जिल्हा परिषदा काबीज करणे यासारखा कार्यक्रम महिला आघाडीच्या आंदोलनासाठी करायचा सराव म्हणून ठीक झाला; पण लोकांची झोप खाड्कन मोडून टाकण्यासारखे स्वरूप त्याला येऊ शकले नाही. नोकरदारांच्या भ्रष्टाचाराविरुद्धचे आंदोलन खरे म्हटले तर करायला सोपे, ताबडतोब हाती फायदा पडून देणारे असे मोठे प्रतिभाशाली स्वरूपाचे आंदोलन ; पण प्रत्यक्षात ते हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच ठिकाणी पार पडले. कर्जमुक्तीच्या अर्जाची संख्या किती याचा गवगवा देशभर झाला; पण आंदोलनाच्या यशस्वितेसाठी अर्जाची जी किमान संख्या ठरली होती त्याच्या जवळपासही आपण प्रत्यक्षात पोहोचलो नाही हे उघड आहे. कर्जमुक्ती हवी असेल, शेतीमालाला भाव हवा असेल तर जातीयवाद्यांना एक मत देऊ नका; कर्जमुक्तीसाठी आणि शेतीमालाच्या भावाच्या मागणीसाठी मला ताठ मानेने दिल्लीला जायला मिळू द्या असे आवाहन मी विधानसभा निवडणुकांआधी शेकडो सभांतून केले. प्रत्यक्षात या आवाहनाला जो प्रतिसाद मिळाला तो पाहिला तर हाती पडलेले कर्जमुक्ती आणि रास्त भाव याबाबतचे तोडकेमोडके यशसुद्धा मोठे अद्भूत वाटू लागते. जे हाती पडले ते आंदोलनाच्या प्रयासाने नव्हे, अंगिकारलेल्या कष्टांमुळे नव्हे तर सामाजिक व राजकीय परिस्थितीच्या

बळिचे राज्य येणार आहे / १४४