पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/146

हे पान प्रमाणित केलेले आहे.

१८६२ च्या सुमारास महाराष्ट्रामध्ये पुणे-नगर या जिल्ह्यांमध्ये झालेला सावकारांविरुद्धचा उठाव याला दक्षिणेतील बंड म्हणावे का आंदोलन ? शेतकरी एकत्र येऊन सावकाराच्या घराला वेढा घालायचे आणि सांगायचे की आमचे कर्जरोखे जाळून टाका. एका सावकाराचे नाक कापले गेल्याचा फक्त उल्लेख आहे. त्या पलीकडे, कुणाला मारहाण झाली किंवा घरातल्या माणसांना त्रास दिला असे एकही उदाहरण त्यात झालेले दिसत नाही. तंट्या भिल्लाने जो संघर्ष केला ते आदिवासी शेतकऱ्यांचे बंड होते. त्यानंतर सासवडला झाला तो उठाव होता.अशा तऱ्हेने हळूहळू आंदोलनाकडे जात असताना असे लक्षात येते की शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चंपारण्य, बारडोली, खेडा या भागांत संख्येची ताकद वापरली आणि त्या संख्येच्या ताकदीबरोबर महात्मा गांधींचे नेतृत्व या आंदोलनाला मिळाले. सरदार वल्लभभाई पटेलांचे नेतृत्व त्याला मिळाले. यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन पहिल्यांदा राष्ट्रीय आंदोलनाबरोबर जुळले गेले. तंट्या भिल्लाच्या आंदोलनाला कुणी राष्ट्रीय आंदोलन म्हटले नाही. वासुदेव बळवंत फडक्यांच्या आंदोलनाला कुणी राष्ट्रीय म्हटले नाही. सासवडचे आंदोलन, काही शेतकरी चिडले आणि उठले असं झाले. शेतकरी जे काही मागत होते त्याचा आणि राष्ट्राचा काही संबंध आहे असे झाले नाही. महात्मा गांधींनी शेतकऱ्यांचे आंदोलन पहिल्यांदा राष्ट्रीय प्रवाहात आणले. खरे तर हे विधान तसे विनोदी आहे. कारण शेतकरी आंदोलन वजा केल्यास त्यावेळी जे काही राष्ट्रीय आंदोलनाचे संस्थान उभे होते त्याचे स्वरूप एखाद्या किरकोळ ओढ्याइतकेच होते. म्हणजे ओढ्याला गंगा येऊन मिळावी तसे शेतकरी आंदोलन त्या राष्ट्रीय प्रवाहाला येऊन मिळाले, त्या प्रवाहाशी एकरूप झाले; पण शेतकरी बोलतात तेव्हा कुणी ऐकत नाही. शेतकरी रडतो तेव्हा सगळ्याचे कान बंद असतात आणि ते संघर्ष करून उठले म्हणजे हे अचानक असे कसे झाले, शेतकरी एकदम का उठले अशी सर्वसाधारण प्रतिक्रिया होते. ही तंट्या भिल्लाच्या वेळी झाली, वासुदेव बळवंत फडक्यांच्या वेळीही झाली आणि चाकणच्या कांदा आंदोलनाच्या वेळीही झाली. शेतकरी एकदम उठून काय मागू लागले आहेत म्हणून अचंबा व्यक्त करतात. जणू काही ही मंडळी परग्रहावरून इथे आली आहेत आणि त्यांना कळत नाही की इथल्या शेतकऱ्याचे हे काय चालले आहे! अशा प्रकारचे नाटक ही मंडळी करीत असतात.

 १९८० पासून सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनात दोन नवीन गोष्टी आहेत. महात्मा गांधींपासून सुरू झालेला एक महत्त्वाचा प्रवाह इथे थांबला. राष्ट्रीय

बळिचे राज्य येणार आहे / १४८