पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/168

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शेतकऱ्यांच्या नेत्याच्या स्मृतिदिनी कर्तबगार शेतकऱ्याचं कौतुक करण्याचा हा समारंभ पाहता पाहता एक आठवण होते आहे. कोल्हापूरला शाहू महाराज शेतकऱ्यांच्या, गावच्या जत्रांना मुद्दाम हजर राहत आणि शेतकऱ्यांचा हा राजा जत्रेतून चालता चालता, शेतकऱ्याचा एखादा चांगला बैल दिसला तर मुद्दाम उभं राहून कौतुक करून, जाणकारपणानं त्या बैलाचं मूल्यमापन करून त्या शेतकऱ्याला बोलावून त्याच्या पाठीवर थाप मारत असे आणि शेतकऱ्याच्या राजाने आपल्या पाठीवर थाप मारली म्हणजे आपले पूर्वज स्वर्गाला पोहोचले इतका आनंद त्या काळच्या शेतकऱ्यांना होत असे. आज असं होतं, नाही असं नाही!
 पण, परवा पंधरा ऑगस्टला पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी काय भाषण केलं? मला काही त्यांच्यावर टीका करायची नाही. उलट, शेगाव मेळाव्यापासून, त्यांनी अंगिकारलेल्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या कार्यक्रमाचा मी पुरस्कार करीत आलो आहे.
 पण जर का शेतकऱ्यांचा खराखुरा प्रतिनिधी लालकिल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९९२ रोजी भाषण द्यायला उभा राहिला असता तर त्यानं भाषणामध्ये पहिलं वाक्य काय वापरलं असतं माहीत आहे? त्यानं म्हटलं असतं, "मला भारतातल्या सगळ्या लोकांचं, शेतकऱ्यांचं अभिनंदन करू द्या. पाऊस येतो की नाही अशी चिंता होती, पण बहाद्दरांनो, पाऊस आला; चांगली पिकं येणार आहेत." भारताच्या खऱ्याखुऱ्या पंतप्रधानाचं लाल किल्ल्यावरचं पंधरा ऑगस्टचं भाषण हे त्या वर्षीच्या पावसांसंबंधानं सुरू झाले पाहिजे असा माझा आग्रह आहे. हे झालं नाही कारण शेतकऱ्यांचे नेतृत्व शासनाला असावे ही पद्धती हरित क्रांतीच्या काळामध्ये कुठेतरी खंडित झाली.

 आज सुधाकरराव नाईकांनी, इथल्या प्रतिष्ठानानं मला आग्रहानं बोलावलं. मी जे काही थोडथोडकं शेतीसंबंधी लिहिलं त्याचं कौतुक केलं; पण मला आठवतं की १९८० मध्ये आम्ही एवढंच म्हटलं की, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही उसाचं फार मोठं साम्राज्य निर्माण केलं म्हणता पण उसाला भाव नाही. उसाला टनाला ३०० रुपये भाव मिळावा एवढीच मागणी आम्ही केली होती. ही मागणी काही काँग्रेसविरोधी नव्हती. त्यावेळी माधवराव बोरस्तेंसारखी काँग्रेसची नेतेमंडळी माझ्याबरोबर व्यासपीठावर हजर होती. त्यामुळे त्याला काही विरोधी पक्षाचा वास नव्हता. आमचं पहिलं कांद्याचं आंदोलन झालं तेव्हा दिल्लीला जनता पक्षाचं सरकार होते. मोहन धारियांनी कांद्यावर निर्यातबंदी लावली

बळिचे राज्य येणार आहे / १७०