पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/170

हे पान प्रमाणित केलेले आहे.

भाव पाडला पाहिजे, भुईमुगाचा भाव कमी राहिला पाहिजे. ज्वारीचा कमाल भाव ठरला पाहिजे; त्याच्या वर जर का भाव जायला लागला तर परदेशातून आयात करून त्या वस्तू आम्ही इथं ओतू पण भाव वर जाऊ देणार नाही हे केंद्र शासनाचं धोरण आहे.
 मीदेखील शेती करायला लागलो तेव्हा सत्कारमूर्ती शेतकऱ्यांच्या उत्साहानंच करायला लागलो. मी काही आंदोलन करायला आलो नव्हतो; पण जन्मानं शेतकरी नसल्याने मला शेती वाचून-वाचून करायला लागायची. नव्याने लग्न झालेली गृहिणी जसं स्वयंपाकशास्त्रावरील पुस्तक वाचत वाचत स्वयंपाक करते तशी मी शेती करीत होतो. त्यावेळी आबासाहेब पाटील शेतकरी मासिक चालवायचे. भुईमूग कसा करायचा? आबासाहेबांनी लिहिलं की भुईमुगामध्ये तीनदातरी खुरपणी करावी. त्यवेळी मी स्वित्झर्लंडमधून संयुक्त राष्ट्रातील नोकरी सोडून आलो होतो. थोडा प्रोव्हिडंड फंड शिल्लक होता. आम्ही आबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे खुरपणी केली आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की तीन खुरपण्या करून आपलं काही जमायचं नाही. भुईमुगाला जो भाव मिळतो तो पाहता तीन खुरपण्या परवडायच्या नाहीत. मग हळूहळू आम्ही एक नवीन तंत्रज्ञानाकडे आलो. त्याला मी नाव दिलं आहे, हरित क्रांती नाही, तर सर्व्हायव्हल टेक्नोलॉजी (Survival Technology). म्हणजे, शेतकरी म्हणून जगून राहायचं असेल तर जे तंत्रज्ञान वापरायला लागतं त्याला आम्ही सर्व्हायव्हल टेक्नॉलॉजी म्हणतो. हे तंत्रज्ञान वापरायचं नसेल तर मग दुसरा एक उपाय आहे. तो म्हणजे गावच्या दूध सोसायटीमध्ये निवडून जायचे किंवा आसपासच्या सोसायट्यांच्या राजकारणात पडायचं, निवडणुका लढवायच्या वगैरे; पण त्या क्षेत्रात गेलं की मग काही, शेतीमालाचा उत्पादनखर्च किती आहे आणि त्याला किंमत काय मिळते याला काही फारसं महत्त्व राहत नाही. पण शेतकऱ्यांना सर्व्हायव्हल टेक्नॉलॉजीशिवाय पर्याय राहात नाही, याचे कारण केंद्र शासनाचे धोरण आहे.

 मी शंकरराव चव्हाणांना ते मुख्यमंत्री असताना कपाशीबद्दल एक आवाहन केलं होतं आणि आताच्या शासनालाही करीत आहे. उत्पादन वाढवायचं आहे ना? आम्ही शेतकरी तुमच्याबरोबर आहोत ; आम्हाला दुसरं काम काय आहे? पण जेव्हा जेव्हा तुम्हाला असं पटेल की केंद्र शासनाचं धोरण हे शेतकरीविरोधी आहे त्यावेळी तुम्ही तुमचा पक्ष सोडायचा नाही, तुमची खुर्ची सोडायची नाही फक्त दिल्लीला जाऊन एक वाक्य बोला की, "तुमचं हे धोरण चुकीचं आहे असं

बळिचे राज्य येणार आहे / १७२