पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/20

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मार्क्सवादविषयी किंवा समाजवादाविषयीची ही भूमिका.
 गांधीवाद टाकून दिल्यानंतर मग हिंदुस्थानातल्या कारखानदारांना समाजवादी हे खरे दोस्त झाले. समाजवादी आणि भांडवलदार यांची ही दोस्ती. नाव समाजवादाचं घ्यायचं आणि कामं जी करायची ती कारखानदारांची करायची आणि वर अशोक मेहतांसारखे पैशाला पासरी समाजवादी, ज्यांना समाजवादाची कल्पना नाही अशी माणसं त्यांच्या बाजूला उभं रहायला पहिल्यापासून तयार झाली. म्हणजे नेहरूंचा प्रयत्न पाणी पुरवा, जमीन लागवडीखाली आणा आणि धान्य पिकवा याच काळामध्ये देशाचं फार मोठं नुकसान झालं. ज्या जमिनी कुरणाखाली होत्या, ज्या जमिनी जंगलाखाली होत्या तिथं अधिक जमीन लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न झाला. कारण नवीन तंत्रज्ञान वापरण्याची काही शक्यता नसल्यामुळे अधिक जमीन तितकं अधिक पीक हे समीकरण.
 १९६५ ते ६७ या काळामध्ये लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले आणि १८ महिन्यांमध्ये पहिल्यांदा शेतीक्षेत्राविषयी धोरण तयार होऊ लागलं. त्याचं श्रेय लालबहादूर शास्त्रींना ते शेतकरी घरातले होते, शेतकऱ्यांच्या प्रश्नाची थोडी जाणीव होती म्हणून त्याला द्यावं, का पाकिस्तानशी त्याच काळामध्ये जी लढाई झाली आणि धान्यधुन्याचा जो प्रश्न तयार झाला त्याला द्यावं? मला वाटतं, माणसं धोरण ठरवत नाहीत. १९६५ मध्ये पाकिस्तानशी लढाई झाल्यानंतर अमेरिकेने हिंदुस्थानवर फार मोठा दबाव आणला आणि त्या दबावाचा सगळ्यात जास्त परिणाम कशावर झाला असेल तर तो हिंदुस्थानातल्या धान्यव्यवस्थेवर. त्यावेळी शास्त्रीजीनी 'जय जवान जय किसान' ही घोषणा केली. एवढंच नव्हे तर आपला अन्नधान्याचा पुरवठा कमी असल्यामुळे रात्रीचं जेवण घेऊ नये, एक जेवण सोडून द्यावं इतकी भूमिका त्यांना घ्यावी लागली. त्यांच्या लक्षात आलं की याच्यापुढे कधी पाकिस्तानशी निर्णायक लढाई करायचा प्रसंग आला तर हिंदुस्थानला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी असण्याखेरीज पाकिस्तानशी लढता येणे शक्य नाही. कदाचित् त्या जाणिवेतून हा नवीन बदल घडून आला असावा; पण पहिल्यांदा नवीन तंत्रज्ञान, संकरित बियाणं, वाणं, नवीन औषधं, नवीन खतं आणि त्याच्याबरोबर शेतकऱ्याला उत्साह वाटेल अशा तऱ्हेची किमती देण्याकरिता कृषिमूल्य आयोगाची स्थापना झाली. या सगळ्या गोष्टी या १८ महिन्यांत घडल्या.

 लालबहादूर गेले आणि त्यांच्यानंतर इंदिरा गांधी आल्या. इंदिरा गांधींनी नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची काही पीछेहाट केली नाही कारण ते शक्यही

बळिचे राज्य येणार आहे / २२