पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/231

हे पान प्रमाणित केलेले आहे.


शेतकीमंत्र्यांचे 'शेतकऱ्यांना, चले जाव'



 'सोडा' या शब्दामुळे असेल; पण पवारसाहेबांचा 'शेतकऱ्यांनो, शेती सोडा' हा सल्ला ऐकून मला आठवण झाली ती पु. ल. देशपांडे यांच्या 'बटाट्याची चाळ'मधील उपवासाच्या कथेची. उपवास करायला बसलेल्या पंतांना कोणी काही तर कोणी काही सोडा असा सल्ला देतो. कोणी म्हणे भात सोडा, कोणी म्हणे बटाटे सोडा, कोणी म्हणे साखर सोडा, कोणी म्हणे नोकरी सोडा आणि शेवटी, 'नोकरी सोडा'. या सल्ल्यामागे पंतांच्या हिताचा विचार नसून पंतांनी नोकरी सोडल्यास चाळीतील त्यांची जागा खाली होऊन ती जागा आपल्याला मिळण्याची शक्यता आहे असा सल्ला देणाऱ्याचा हेतू असावा अशी टिपणी स्वत: पु. ल. देशपांडे करतात.
 पवारसाहेब काही मनात येईल तसे बोलणारे नाहीत; मोठे धोरणी, राजकारणधुरंधर नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. ते बोलतात ते त्यांच्या मनातूनच बोलतात, बुद्धीला पटलेले असते म्हणूनच बोलतात असेही नाही. इतिहास असे सांगतो की, त्याच्या मागे त्यांचे काही निश्चित धोरण असते. आजही त्यांच्या बोलण्यात काही लेचेपेचेपणा दिसला तरी तो त्यांनी जाणीवपूर्वक ठेवलेला असतो आणि पुढेमागे, राजकारणाच्या खेळीत त्याचा उपयोग आपल्याला व्हावा याची अटकळ त्यांनी बांधून ठेवलेली असते.

 'शेतकऱ्यांनो, शेती सोडा' या सल्ल्यामागे त्यांचे काय धोरण असू शकते ? शेतकरी, शेती परवडत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत आहेत आणि त्याचे सर्व किटाळ आपल्या अंगावर येत आहे; शेतकऱ्यांनी शेती करायचे सोडून दिल्यास त्यंनी केलेल्या आत्महत्या या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ठरणार नाहीत आणि त्याचे बालंट शेतकीखात्यावर किंवा मंत्रालयावर येणार नाही या धोरणाने कदाचित त्यांनी 'शेतकऱ्यांनो, शेती सोडा' असा सल्ला दिला

बळिचे राज्य येणार आहे / २३३