पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/270

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळेल ही सहकारी साखर कारखाने काढण्यामागची कल्पना आणि आशा होती.
 पद्मश्री विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ इत्यादींनी ही कल्पना बाळगली, राबवली, सहकारी कारखानदारीची सुरूवात झाली. सहकारी कारखानदारीने चांगले बाळसे धरले. महाराष्ट्रात ऐशींच्या आसपास सहकारी साखर कारखाने तयार झाले. महाराष्ट्रातील बागायती प्रदेश साखर कारखान्यांनी नटून गेले. सारा परिसर साखर कारखान्याची प्रचंड इमारत, आसपासच्या प्रदेशात बांधलेल्या गुळगुळीत सडका, विजेच्या दिव्यांची रोषणाई, शोभिवंत झाडांच्या बागा, शाळा, बाजारपेठा, बँका यांनी गजबजून गेला. विकासाची पेठ फुटली आहे अशी भावना तयार व्हावी असा चमचमाट दिसू लागला.
 महाराष्ट्रात गेल्या पंचवीस-तीस वर्षांत उदयाला आलेले राजकीय नेतृत्व मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यातून उदयाला आले आहे. साखर कारखान्यांच्या एकूण कामगिरीविषयी कुणाचेही काहीही मत असले तरी शेतकऱ्यांच्या कमीजास्त शिकलेल्या पोरांची कारखान्याचा गाडा चालविण्याची कार्यक्षमता आणि ताकद त्यांनी सिद्ध केली यात काही शंका नाही. साखर कारखान्यांच्या बऱ्याच अध्यक्षांची दिनचर्या मी पाहिली आहे. त्यांच्या कामाचा व्याप, त्याची समज, कामाचा उरक, राजकीय हातोटी यांनी जवळ जवळ प्रत्येक वेळी मी विस्मित झालो आहे. सहकारी चळवळीची आणि विशेषतः सहकारी साखर कारखान्याची तालीम शाळा तयार झाली नसती तर मंत्रिपदाची धुरा सांभाळण्याच्या ताकदीची माणसे मिळणे ग्रामीण भागात कठीणच झाले असते. महाराष्ट्र राज्यात बाळासाहेब खेरांच्या मंत्रिमंडळापासून ते यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळापर्यंत जो काही फरक घडून येऊ शकला आणि ग्रामीण कर्तृत्वाला मुंबईदरबारी जे स्थान मिळाले त्याचे फार मोठे श्रेय साखर कारखान्यामुळे मिळालेल्या अनुभवाला द्यावे लागेल.
 सहकारी साखर कारखान्यांच्या उदयाबरोबर उसाखालील क्षेत्र वाढले, उसाचा विकास झाला, ऊस उत्पादकांना कर्जपुरवठ्याची सोयीस्कर व्यवस्था झाली याबद्दलही दुमत असण्याचे काही कारण नाही. कारखान्यांच्या परिसरांतील विकास, ऊस आणि साखर उत्पादनात वाढ आणि ग्रामीण भागांत नवीन राजकीय नेतृत्वाचा उदय याबद्दलचे श्रेय निश्चितपणे सहकारी साखर कानखान्यांना दिले पाहिजे.

 पण यापलीकडे जाऊन सहकारी चळवळ म्हणजेच शेतकऱ्यांची चळवळ,

बळिचे राज्य येणार आहे / २७२