पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/330

हे पान प्रमाणित केलेले आहे.


निर्बंधमुक्त साखर आणि

निर्बंधभक्त साखरसम्राट



 शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांना जशी वार्षिक परीक्षा तशीच वित्तमंत्र्यांना अंदाजपत्रकाच्या दिवसाची कसोटी. अंदाजपत्रक प्रतिनिधीसभेला सादर करताना वित्तमंत्र्यांकडे दोन तास, दूरदर्शनच्या माध्यमाने, साऱ्या राष्ट्राचे लक्ष लागून राहते. आपल्या अंदाजपत्रकी भाषणात वित्तमंत्र्यांना अनेक करामती करून दाखवाव्या लागतात. गेल्या आर्थिक वर्षात एखादी अपवादात्मक सुलक्षणी गोष्ट घडली असेल तिचा नगरा पिटणे, बहुतांश विपरीत घटनांवर जमेल तितके पांघरूण घालणे, पंतप्रधानांची शक्य तितकी चापलुसी करणे, आपला अर्थशास्त्रातला असलेला किंवा नसलेला अधिकार दाखविणे, कुवतीप्रमाणे संस्कृत वाङ्मयाचे किंवा निदान बाजारी शेरोशायरीचे प्रदर्शन करणे इत्यादी इत्यादी अनेक करामती वित्तमंत्र्यांना करून दाखवाव्या लागतात. यात कोठेही उणे पडले तर त्यांची सारी राजकीय कारकीर्द धोक्यात येण्याची शक्यता असते. या एका दिवसातील दोन तासांच्या करामतीवर त्यांचे सारे भविष्य टांगून असते.

 वार्षिक परीक्षेचे महत्त्व अगदी उनाड विद्यार्थ्यांनासुद्धा वर्षाच्या सुरुवातीपासूनच पक्के माहीत असते ह्न एके दिवशी वार्षिक परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे हे त्यांना पक्के माहीत असते. एक दिवस यमाच्या दरबारात झाडा द्यावा लागणार आहे अशी श्रद्धा असलेले पापभीरू भाविकसुद्धा जीवात जीव असेपर्यंत पुण्याचा रस्ता सोडून भलत्याच रस्त्याला लागतात, तसेच या विद्यार्थ्यांनाही जवळच्या चित्रपटगृहात खेळ, नाटकाचे प्रयोग, सहली, वेगवेगळ्या निवडणुका आणि 'डेज' यांचा मोह काही टाळता येत नाही. परीक्षेला अजून वेळ आहे असे मनाचे समाधान करीत उनाड विद्यार्थी अभ्यास बाजूला ठेवून सारे काही कार्यक्रम यथासांग पार पाडतात. परीक्षा महिन्या दोन महिन्यांवर आली की मग मात्र परीक्षेच्या तयारीसाठी घोकंपट्टीला सुरुवात करतात. वर्षभर अभ्यास केला नाही तरी शेवटच्या महिन्यातील

बळिचे राज्य येणार आहे / ३३२