पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/343

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहवले नाही म्हणून साऱ्या करपे कुटुंबाने विष प्राशन करून इहलोक यात्रा संपविली.
 एकट्यादुकट्या आत्महत्येच्या प्रकरणात परिस्थितीचे संपूर्ण निदान कठीण असते. आर्थिक आपत्तीमागे काही वैयक्तिक दुर्दैवाच्याही कथा लपलेल्या असतात; पण ३०० शेतकरी, तीन राज्यांतील, वेगवेगळ्या जिल्ह्यांतील, दूरवर विखुरलेल्या खेड्यापाड्यांत-महिन्या दोन महिन्यांच्या कालावधीत अशा निर्वाणीच्या निर्णयाला येतात; ही अशी आत्महत्यांची लागण कशी झाली?
 काही मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्री म्हणतात की आत्महत्यांची प्रकरणे पुंजक्याने घडतात. जीव जगवावा, त्यासाठी पराकोटीची धडपड करावी अशी साऱ्या जीवमात्रांची प्रेरणा असते; पण कुटुंबातील कोणी जीव दिला, गावात कोणी फाशी लावून घेतली किंवा समाजातही अशा दोनचार हकिकती घडल्याचे कानावर पडले की साऱ्या विपत्तीची अंत करण्याचा आत्महत्या हा एक मार्ग असू शकतो या कल्पनेचा मनात प्रवेश होतो आणि ती कल्पना ठाण मांडून बसते. मंडलप्रकरणी एका गोस्वामीने आत्मदहनाचा प्रयत्न केला याची बातमी पसरताच शंभरावर तरुण विद्यार्थ्यांनी स्वत:ला पेटवून घेतले. नव्याने लग्न झालेल्या तरुणीस सासरी जाच असला तर तिच्या मनात पटकन जीव देऊन सुटका करून घ्यावी असा विचार येतो; कारण अनेक तरुणींनी असे केल्याचे तिच्या कानी पडलेले असते. आत्महत्येचा निर्णयच नव्हे, तर साधनहा अशाच पद्धतीने ठरते. नवविवाहिता स्वतःला पेटवून घेतात; शेतकरी कीटकनाशके पितात. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात ही कीटकनाशके सहज उपलब्ध असतात हे कारण झाले; पण त्याबरोबर विष पिऊन जीव दिलेल्या शेतकऱ्यांच्या कहाण्या कानावरून गेल्या असल्या म्हणजे जिवाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांचे हात आपोआपच कीटकनाशकाच्या बाटलीकडे वळतात,

 दहा वर्षांपूर्वी आत्महत्यांची प्रकरणे घडली तेव्हा मी आंध्र प्रदेशातील प्रकाशम् जिल्ह्यात गेलो होतो. ज्या ज्या कुटुंबांतील माणसांनी जीव दिला त्या साऱ्यांना भेटलो. साऱ्यांची कर्मकथा जवळजवळ एकसारखीच. स्वतःची एकदोन एकर जमीन असलेले छोटे शेतकरी कापसाचे पीक जमले तर एकरी पाचेक हजार रुपये हाती पडतील अशा आशेने पाचसहा एकर जमिनी भाडेपट्टीने घेतात, घरच्या लक्ष्मीचे दागदागिने गहाण टाकतात, बियाणे खरीदतात, खते औषध खरीदतात आणि कापूसशेतीच्या जुगाराला लागतात. त्यावर्षी पावसाने डोळे वटारले, किडींचे असे जबरस्त हल्ल्यावर हल्ले झाले की ते आटोक्यात

बळिचे राज्य येणार आहे / ३४५