पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/345

हे पान प्रमाणित केलेले आहे.

ज्यांनी समजूनउमजून डोळे आणि कान बंद केलेले नाहीत त्यांना शेतकऱ्यांच्या दुर्दैवाची आणि रोषाची जाणीव होणे काही कठीण नव्हते.
 हरित क्रांतीचे शेतीची सारी पद्धतच आमूलाग्र बदलली आहे. पिके बुडाली म्हणजे शेतकऱ्यांपुढे पहिले संकट उभे राहते ते, विजेचे बिल रोख भरावे कसे? त्यानंतरचे संकट बी-बियाणे, खते, औषधे यांकरिता घेतलेल्या कर्जाचा हप्ता फेडावा कसा? विविध राज्यांतील शेतकरी आंदोलने १९७० पासून विजेचे दर आणि कर्जमुक्ती यावर भर देतात ते यामुळे. ही दोन देणी पहिल्यांदा जबडा वासून पुढे येतात. भरणा करता येत नाही म्हणून द्यायची रक्कम फुगत जाते प्रत्येक वर्षी पावसाळा आला म्हणजे शेतकरी पुन्हा एकदा उमेदीने आणि हिमतीने कामाला लागतो. जमेल तसे बियाणे, खते मिळवतो आणि एखाद्या जुगाऱ्याच्या कैफाने जमिनीत घालतो. काही वेळा पिके बुडतात, काही वेळा थोडी कमी बुडतात. काही झाले तरी शेवटी परिणाम एकच. पिके चांगली असली तर किमती पडतात आणि वाईट असली तर वाढत्या किमतीचा शेतकऱ्याला काहीच उपयोग नसतो. वर्षाअखेरीस साऱ्या शेतीच्या हिशेबांचा ताळेबंद एकच गोष्ट दाखवतो-मुद्दल, व्याजावर व्याज, दंडव्याज सारे मिळून देण्याची रक्कम आणखीच फुगली आहे.
 दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यत, शेतकऱ्यांच्या मनात एक सन्मानाची जबरदस्त भावना असते. खोटेपणा त्याला रुचत नाही. हा सारा धार्मिक शिकवणुकीचा परिणाम असेल, कदाचितः पण, कर्ज बुडविणे ही कल्पना त्याला पटत नाही - भले सावकाराने 'आल्गुन फाल्गुन शिमगा' अशी खोटी आकडेमोड केली असो; भले शेतीच्या व्यवसायात हाती काही लागणार नाही अशी व्यवस्था ठरवून झालेली असो.

 हे असे पिढ्यान् पिढ्या चालले आहे. वय झाले, शरीर थकले म्हणजे म्हाताऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात येते की आयुष्यभर खेळलेल्या खेळात ते हरले आहेत. बापाकडून वारशात मिळालेल्या कर्जापेक्षा कितीतरी जास्त कर्जाचा बोजा आपण आपल्या लेकराच्या डोईवर ठेवून जात आहोत या कल्पनेने तो व्याकूळ होतो. वयोमानामुळे हात चालत नाहीत, काम होत नाही. आपण आता केवळ पोराच्या संसारावर भार बनून राहिलो आहोत; हे त्यांच्या लक्षात येते. पिढ्यान्पिढ्या, अशा वयात शेतकरी आई बाप आपल्या पोरांना सांगत, 'पोरांनो, आमचं आता वय झालं, सारा काही संसार पार पडला, तुम्ही कर्तेसवरते झाले. आता एकच इच्छा राहिली आहे; काशीला

बळिचे राज्य येणार आहे / ३४७