पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/346

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मरण यावे, म्हणजे देहाचे सोने होईल. एवढी एक इच्छा काही करून पुरी करा.' म्हातारा-म्हातारी काशीला जाण्यास निघत, एक लहानसे गाठोडे बरोबर घेऊन. त्यातली काही काशी म्हणा, काही पंढपूर म्हणा -एखाद्या तीर्थक्षेत्री पोहोचत. अशा क्षेत्रस्थानी धनी लोक 'पुण्याय पापक्षालनार्थ।' येतात; गरीबगुरिबांना, अपंग भिकाऱ्यांना भेजनावळीत जेवू घालतात, काही नाही म्हटले तरी आठवड्याभरात दोनतीन जेवणांची तरी सोय होते. सिंदबाद खलाशाच्या कहाण्यांत, 'एका बेटावरील एका दरीत वयोमानाने थकलेले हत्ती मरण्याआधी येऊन ठाकतात' असे वर्णन आहे. काशीस जावे, नित्य वदावे ।', काशीस जाऊन मरण आले तर सरणाचादेखील खर्च येत नाही. 'काशीस जाणे' हा पिढ्यान्पिढ्या शेतकऱ्यांनी स्वीकारलेला सामूहिक आत्महत्येचा मार्ग आहे.
 हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे बिगरशेतकरी लोकसंख्येला मुबलक अन्नधान्य मिळू लागले हे खरे; पण त्यासाठी लागणारे बियाणे, खते, औषधे आणि मजुरी यांचा खर्च मिळणाऱ्या किमतीतून कधीच पुरा भरून आला नाही. शेतकरी गरिबीत आणि कर्जात खचतच गेला. वाढत्या कर्जबाजारीपणाचे प्रमाण पाहिले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या आहे त्यापेक्षा कितीतरी पट मोठी असायला पाहिजे होती; पण असे झाले नाही. शेतकऱ्यांची सन्मान आणि प्रतिष्ठेची परंपरा ढासळत आहे. मोठेमोठे जमीनमालक, त्यांची प्रतिष्ठा मोठी, राजकीय सत्ताही त्यांच्याच हाती. कर्ज परत करणे म्हणजे आपल्या इभ्रतीस कमीपणा आणणारी गोष्ट समजात! कर्ज बुडविण्यास एक प्रकारची सामाजिक प्रतिष्ठा लाभली आहे. याला कोणी 'नीतिमत्ता खालावली' असे म्हणेल; पण या नैतिक अधःपतनामुळेच शेतकऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी कीटकनाशकांच्या बाटलीकडे किंवा जवळच्या विहिरी-डोहांकडे जायच्या थांबल्या आहेत. अन्यथा, ज्यांच्या संसारला 'सांजी' येण्याची काही आशाच नाही त्यांनी आयुष्य कंठावे कोणत्या आधाराने ?

 यंदाचा पहिला उठाव हरियाणातील शेतकऱ्यांनी केला. विजेच्या दराच्या प्रश्नावर नोव्हेंबर ९७ मध्ये उग्र निदर्शने झाली. लोहमार्गावर बसलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला; ८ ठार, शंभरावर जायबंदी. १२ आणि १३ डिसेंबर रोजी 'शिवशाही' पोलिसांनी, कापसाचा भाव वाढवून मागणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील आंदोलक शेतकऱ्यांवर गोळीबार केला; ३ ठार १७ जखमी. मध्य प्रदेशीतील बैतूल जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक साफ बुडाले .

बळिचे राज्य येणार आहे / ३४८