पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/383

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हे षड्यंत्र मोडावयाचे आहे. ही ऐतिहासिक कामगिरी भारतातील शेतकऱ्यावर येऊन पडलेली आहे. इतिहास आज येथे घडत आहे.
 शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ही नवी जाणीव शेतकऱ्यांपर्यंत न्यावयाची आहे. अरे शेतकरी बांधवांनो! बाहेरील शत्रू तुम्हास रात्रंदिवस नागवीत आहे. यावेळी घरातील भांडणे विझवून टाका. एकमेकातील वादविवाद विसरा. जेव्हा कधी बाहेरच्या शत्रूचे निर्दालन होईल तेव्हा निवांत वेळ मिळेल असल्या करमणुकींना, पण आज सर्वांनी एक व्हा. कोणी राजकीय पक्षा-पक्षांची भांडणे तुमच्यात आणून लावील. कोणी म्हणेल काँग्रेस मोठी, कोणी म्हणेल जनता मोठी, कोणी म्हणेल आणखी कोणी देवी मोठी. हे सर्व पक्ष शेतकऱ्यांच्या शत्रुचे हस्तक आहेत. आजपर्यंत त्यांच्या हातात अमाप सत्ता होती. काय भले केले त्यांनी शेतकऱ्यांचे? आम्हाला ही देवी नको, तो प्लेग नको आणि तो कॉलरा नको. राजकारणी संधिसाधूंनो, चले जाव! तुमची भांडणे आमच्यात लावू नका.
 नका सांगू आम्हाला जुन्यापुराण्या कल्पना आणि जातीविचार. कोण मोठा आणि छोटा. आमच्यात असे भेद पाडून यांनी आम्हाला सर्वांनाच छोटे बनवले आहे. आम्ही नाही मानत कोणताही भेद. जो शेतावर कष्ट करतो तो शेतकरी आणि शेतकरी तितका एक एक!
 आज ही पुरुषार्थाची नवी ज्योत, ठिणगी पेटवावयास फार कठीण वाटते; परंतु शेतकरी संघटकांनी निराश होण्याचे कोणतेही कारण नाही. रान शुष्क कोरडे झालेले आहे. प्रयत्न चालू ठेवले तर एका प्रयत्नाने दुसऱ्या प्रयत्नाला जोर येतो. एक सैनिक पडला तर दुसरा त्याची जागा घेतो. एका हुतात्म्याची जागा शेकडो वीर सैनिक घेतील आणि एक दिवस असे रान पेटेल की त्यात सत्य, असत्य, न्याय, अन्याय याचा निवाडा होऊनच थांबेल. त्या यज्ञाची आम्ही तयारी करीत आहोत.
 ग्रामीण भागांतील संघर्षाचा दुसरा प्रकार हा जास्त अर्थपूर्ण आहे. जुने जमीनदार आणि कष्टकरी बागायतदार कोरडवाहू शेतकरी यांच्यातील वाद हे आर्थिक हितसंबंधांवर आधारलेले आहेत. त्यांचा विचार वेगळा करावयास हवा.


 तीन

 भारतीय शेतकऱ्यांची दैनावस्था ही त्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या मोबदल्यामुळे आहे हे आपण पाहिले. या अपुऱ्या मोबदल्याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळी

बळिचे राज्य येणार आहे / ३८५