पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/74

हे पान प्रमाणित केलेले आहे.



भूखंडखोरांचा बंदोबस्त



 गळे गुंड हटले
 देशातील शासनाची सारी सूत्रे भूखंडसम्राटांकडे जाण्याचा धोका आहे. तसे राजकारण शेतकरी, कामगार, कारखानदार, व्यापारी आदी उत्पादकांच्या हाती कधीच नव्हते. स्वातंत्र्यानंतर ते अधिकाधिक हातभट्टीवाले, तस्कर, लायसेंस परमिटदार, काळाबाजारवाले, मादक द्रव्यांची वाहतूक करणारे, भूखंडखोर आणि नोकरदार यांच्या हाती गेले. जिल्ह्याचे राजकारण हातभट्टीवाल्यांच्या हातात, राज्य नेतृत्व तस्कर आणि भूखंडखोर यांना सुपूर्द, कारखानदारी व आयात-निर्यातसंबंधी परवान्यांचे खेळ करणारे केन्द्रात आणि मादक द्रव्यांचे वाहतूकदार खलिस्तान, तामिळइलम इत्यादी फुटीर गटांत अशी सगळ्या गुंडांनी आणि दादांनी देशाची आपापसात वाटणी करून घेतली आहे.
 गेल्या दोन वर्षांपासून परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. या गुंड दादांना पोसणारे वर्षानुवर्षे चालत आलेले भ्रष्टाचाराचे काही प्रकार थोडे आटोक्यात येत आहेत; निदान ते आटोक्यात येतील अशी चिन्हे दिसत आहेत; पण भूखंडाचा भ्रष्टाचार मात्र अधिकाधिक पसरत चालला आहे. त्यामुळे सगळे राजकारण भूखंडांचे खेळ करणाऱ्यांच्या हातात जात आहे.
 राहिले भूखंड-तस्कर

 अर्थव्यवस्था जसजशी खुली होईल, परेदशी व्यापार मोकळा होईल तसतसे आयात-निर्यातीच्या परवान्यांचा खेळ खेळून पैसे कमावण्याची शक्यता कोणालाच राहणार नाही. ना नोकरदारांना, ना व्यापारी कारखानदारांना, ना पुढाऱ्यांना. पंजाबमधील परिस्थिती जसजशी आटोक्यात येईल तसतसे मादक द्रव्यांच्या वाहतुकीचा पाया उखडला जाईल. तीच परिस्थिती हातभट्टीदादांची आणि तस्करांची. सगळ्या गुंडदादांची सद्दी संपत आली आहे; पण

बळिचे राज्य येणार आहे / ७६