पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/99

हे पान प्रमाणित केलेले आहे.


निसर्गशेतीवरील किडी



 निसर्ग-विज्ञान-व्यापार
 विषय : नैसर्गिक शेती तथा निसर्गविज्ञान. या 'तथा' शब्दाने थोडा गोंधळ होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक शेती म्हणजेच निसर्ग विज्ञान शेती हे काही खरे नाही. शिबिराचे सूत्रधार 'बळिराजा मासिक' आधुनिक व्यापारी शेतीचे मासिक अशी बिरूदावली मिरवते. निसर्गविज्ञान शेतीची चर्चा आधुनिक व्यापारी दृष्टिकोनातून घडवून आणण्यासाठी महाराष्ट्रात जागोजागी उदंड कष्ट, प्रयास, तपस्या करणारी निष्ठावान मंडळी एकत्र जमा झाली आहेत.
 शब्दांचे मोठे पीक
 विषय सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गेल्या वर्षभरांत अर्ध्या डझनावर देशी-परदेशी विद्यार्थी, या विषयावर डॉक्टरेट करणारे, मला भेटले आहेत. शेतकऱ्यांपेक्षा हा विषय विद्वानात अधिक लोकप्रिय झाल्याने शब्दांचे पीक मोठे उदंड आले आहे. कोणी वैकल्पिक (Alternative) शेती म्हणतो, म्हणजे हरित क्रांती घडवून आणण्याकरिता वापरलेल्या सुधारित बियाण्यांची वाणे आणि वरखते व औषधे यांच्या उपयोगाने होणाऱ्या शेतीला पर्याय देणारी शेती, कोणी फक्त पेट्रोलियमविरहीत शेती म्हणतो, कोणी जैविक, कोणी Biotic शेती. कोणी म्हणते पर्यावरणी (Ecological) शेती, कोणी शाश्वत (Sustenable) शेती,कोणी भूनाग (Vermiculture) शेती इ. शब्दप्रयोग आहेतच. इंग्रजीत शब्दांची लयलूट आणिक मोठी आहे. Organic, Natural, Bio-Dynamic, Permaculture इ.इ.
 नैसर्गिक शेतकऱ्यांच्या छटा

 फारसे तपशिलात न जाता सांगायचे झाले तर या सगळ्या प्रकारांमध्ये समानता एवढी की शेतीच्याबाहेरून येणाऱ्या, विशेषत: कारखानदारीत तयार

बळिचे राज्य येणार आहे / १०१