या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बालपण १९ मज्जातंतूंना टोचून टोचून तो धारण करणा-या माणसास बेजारगतीस आणतात. हा नित्याचा अनुभव बाबुराच्या बाबतीत सतरा आणे अनुभवास आला. बिचारा इ. स. १४९४ ला फवना प्रांताच्या गादीवर आला, आणि या वेळेपासून जी लढत सुरू झाली ती तो मरेपर्यंत एकसारखी चालू होती. त्याच्या आयुष्यातील दोन इद म्हणजे आपल्या भाषेत सांगावयाचे तर दोन दिवाळ्या त्यास केव्हाही एके ठिकाणी गेल्या नाहीत. पायाला सारखी भिंगरी होती आणि राज्याच्या उलथापालथी चालू होत्या. आज गादीवर बसावें. राजा झालो म्हणून समाधानाचा सुस्कारा सोडावा तोंच पुन्हा अशा कांहीं विचित्र घटना घडून याव्यात, की राज्यत्याग करून रानोमाळ अन्नापाण्यावांचून उपाशीतापाशी भटकण्याचा प्रसंग यावा, अशी ही धुमश्चक्री एकसारखी चालू होती. आज राजा तर उद्या रंक, आज अमीर तर उद्या फकीर असे होत होते. सुखदुःखाचा-पाठशिवणीचा खेळ एकसारखा चालू. होता. क्षणांत आनंदाच्या चांदण्यांत तर क्षणांत संकटांच्या खाईत असे बाबुराचे भाग्यचक्र एकसारखे फिरत होते. ।