या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बादशहा ।

। । ३० शैबानीखानाचा हा तडाखेबंद धूमधडाका पाहून बाबुर मनांत हादरला. तो सर्वांचा नि:पात करीत करीत आतां शिल्लक राहिलेले हे तैमूरचे शेवटचे ठिकाण कावूल सर करणार; त्याचा मोर्चा काबूलकडे वळणार अशी बातमी आली. त्याबरोबर बाबुरास भयकर हादरा बसला. कारण शैबानीखानाचा निकाल लावावा असे त्यास वाटत होते व त्याने तशी धडपडही चालविली होती. त्याच्याशी सामना देण्यासाठी म्हणून जेव्हा जेव्हां आमंत्रण आले तेव्हां तेव्हां तो मोठ्या हिरीरीने त्या ठिकाणी गेलाही, पण त्याची निराशाच होत होती. शैबानीखानास जेर करण्यासाठी त्याला त्याच्या तोडीचा जोडीदार भेटला नाहीं. नाहींतर त्याने ती तयारी मोठ्या हौसेनें केली असती. पण तसे झाले नाही. शैबानीखानाच्या लष्करी सामर्थ्याची, त्याच्या सेनापतित्वाची बाबुरास पूर्ण माहिती होती. रणांगणांत त्याचा हात धरणारा त्या वेळी कोणी नव्हता हैं तो जाणून होता. तेव्हां त्याच्याशी तुटपुंज्या सामर्थ्याने सामना देणे मूर्खपणाचे होते. त्यांत सर्वस्वाचा घात हा ठेवलेला होता. तेव्हां काबूल लढविण्यात अर्थ नाहीं असे त्याने ठरविलें. काबूल शहर अबदर रझाकच्या ताब्यात दिले आणि तेथून आपले सैन्य घेऊन हिंदुस्थानचा रस्ता सुधारला.