पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/10

हे पान प्रमाणित केलेले आहे.

लिया, पोर्शिया, हेलीना ह्या स्त्रियांची चरित्रे घेतली, किंवा इटालियन राष्ट्रांतील कोरिना हिचें चरित्रें घेतलें; तरी आमच्या राष्ट्रांतील अहल्या, सीता, तारा,मंडोदरी, कुंती, द्रौपदी इत्यादि स्त्रियांच्या परम पवित्र, पुण्यशील, चमत्कृति-प्रचुर आणि सुरस चरित्रांत जे स्वारस्य आणि जें अप्रतिमत्व आहे, तेंच आह्मांस परदेशीय स्त्रियांपेक्षां स्वदेशीय स्त्रिया ह्या नात्याने अधिक कौतुकास्पद व अभिनंदनीय असे वाटणें साहजिक आहे. ह्या वंदनपात्र साध्वी स्त्रियांसंबंधानें,

अहल्या द्रौपदी सीता तारा मंडोदरी तथा।
पंचकं ना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ॥ १ ॥

ह्मणजे “अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंडोदरी ह्या पांच स्त्रियांचे जो नित्य स्मरण करील त्याचें महत्पापही नाश पावेल.” असा कोणी मार्मिकानें जो महिमा वर्णन केला आहे, तो अगदीं यथार्थ आहे. ह्या स्त्रियांप्रमाणेच, याज्ञवल्क्य ऋषीची पत्नी मैत्रेयी, वाचकूची मुलगी गार्गी, शकुंतला, गांधारी, उत्तरा, यशोदा, राधा, रुक्मिणी, दमयंती, उखा, वगैरे पुराणप्रसिद्ध स्त्रियांचीं चरित्रें महत्त्वाचीं व बोधपर असून, तीं हिंदुस्थानांत पुराणकालींही किती थोर स्त्रिया निर्माण झाल्या होत्या, हें सिद्ध करीत आहेत.

 ह्या पौराणिक कालांतून इतिहासाच्या कालांत आलें, ह्मणजे दिल्लीची राज्ञी प्रेमदेवी, कालिदासाची पत्नी विद्योत्तमा, भास्कराचार्यांची कन्या लीलावती, वराहमिहिराची बायको, आणि लक्ष्मणसेन राजाची महाराणी, ह्या विदुषी व शास्त्रपारंगत स्त्रिया दृष्टीस पडतात. ह्यानंतर हिंदुस्थानच्या वीरकाला (age of chivalry) मध्ये प्रवेश केला, तर रजपूत स्त्रियांच्या अलौकिक गुणांनीं नेत्र दिपून जातात. त्यांचे अपार शौर्य, अढळ पातिव्रत्य, अप्रतिम तेजस्विता, लोकोतर खामिभक्ति, असाधारण स्वार्थत्याग, आणि अपूर्व रणोत्साह पाहून अंतःकरण आनंदानें व आश्चर्यानें थक्क होऊन जाते; व अशीं स्त्रीरत्नें ज्या राष्ट्रांत निर्माण झालीं, तें राष्ट्र धन्य होय असें वाटतें. राणी संयोगिता, राजकन्या कूर्मदेवी, राणी पद्मिनी, गुर्जरदेशस्थ राज्ञी कमलदेवी व देवलदेवी, साध्वी मिराबाई, ग्वाल्हेरची राणी मृगनयना, ताराबाई, रूपमती, गढमंडलाची राणी दुर्गावती, जोधपुरची राजकन्या जोधाबाई, ह्यांची चरित्रें इतकीं