पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/107

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८३

परंतु खरा प्रकार असा नव्हता. महाराणी बायजाबाईसाहेब ह्या स्वभावतः फार तेजस्वी व तीव्र होत्या, व त्यांना ग्वाल्हेरचा राज्यकारभार स्वतःच्या हातीं ठेवण्याची मनुष्यस्वभावानुरूप इच्छा होती, ह्या दोन्ही गोष्टी जरी मान्य केल्या, तरी जनकोजीराव ह्यांस त्यांनी अतिशय वाईट रीतीनें वागविलें व कलहाचे बीजारोपण केलें, असेंच केवळ ह्मणतां येत नाहीं. हा कलह उत्पन्न होण्यास ग्वाल्हेर दरबारचे कुटिल लोक व त्यांच्या दुष्ट मसलती, आणि जनकोजीरावांची अल्प बुद्धि व उच्छृंखल वृत्ति हींच कारणीभूत झालीं असावींत. ग्वाल्हेरच्या दुस-या एका इतिहासकारांनी असें लिहिलें आहे कीं, "बिनतोडीचे वेळीं बायजाबाईनें जनकोजी शिंद्यांस दत्तक घेतलें, आणि दौलतरावानें सांगितल्याप्रमाणें आपण जन्मभर राज्य चालवीन असा मनांत निश्चय करून, दत्तक घेतलेल्या मुलास आपल्याजवळ शिक्षणांत ठेविलें. हा मुलगा तारुण्यावस्थेंत येतांच, आपल्यास वैभवास आणणारीचे विचारें न वागतां, कांहीं कुमार्गी व आपस्वार्थी लोकांची संगत धरून, त्या बाईच्या शिक्षणांतून मुक्त होण्याची इच्छा करूं लागला. त्या जनकोजी शिंद्यास अनुपकारीपणाचे मार्गास लावणारे व कांहीं नवेंजुनें होऊं इच्छिणारे लोकांनीं त्याचा पक्ष धरिला. इंग्रज लोकही, याच संधीस, नवा राजा गादीवर बसला त्याचे नांवचा हरएक सरकारी कागदावर शिक्का झाल्याखेरीज तो कागद कोणत्याही प्रकारें ते दस्तऐवजांत खरा मानीनातसे झाले. तेव्हां जनकोजी शिंद्याचे पक्षास अधिक बळकटी आली, व बायजाबाईपासून त्याला दूर करण्याचा त्यांणीं विशेष प्रयत्न मांडिला." हीच वास्तविक खरी गोष्ट असावी असें मानण्यास हरकत नाहीं.

 जनकोजीराव ह्यांस बायजाबाईसाहेबांनीं दत्तक घेऊन त्यांस आपला नातजांवई केले, व ग्वाल्हेर संस्थानच्या राजपदाचे धनी केलें; ही