पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/108

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४

गोष्ट लक्ष्यांत घेतली ह्मणजे जनकोजीराव ह्यांनी आपल्या वैभवसंपन्न व राज्यव्यवहारचतुर मातुश्रीच्या आज्ञेंत चालणें हें त्यांचें कर्तव्य होतें असेंच ह्मणावे लागतें. परंतु त्यांनी ह्या कर्तव्यास पराङ्मुख होऊन लहानपणापासून मूर्ख व हलकट लोकांच्या नादीं लागून कुमार्ग स्वीकारला. त्यामुळें दिवसेंदिवस बायजाबाईसाहेबांच्या मनांत त्यांचे विषयीं तिरस्कार व अप्रेमबुद्धि उत्पन्न होऊं लागली. महाराज जनकोजीराव ह्यांस दत्तक घेतल्यानंतर कित्येक दिवसपर्यंत, बायजाबाईसाहेब त्यांच्याशी प्रेमभावानें वागत असून त्यांचे लडिवाळपणानें कौतुक करीत. परंतु जेव्हां महाराजांनीं दुष्ट लोकांच्या नादीं लागून, त्यांच्या शिकवणीनें, स्वतंत्रपणानें वागण्याचा व शिरजोर वर्तन करण्याचा क्रम आरंभिला, त्या वेळेपासून त्यांनी त्यांस आपल्या ताब्यांत ठेवण्याचा प्रयत्न केला. ग्वाल्हेर दरबारचे माहितगार व जुने रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांच्याही कानांवर ह्या अप्रिय गोष्टी अनेक वेळां गेल्या, व त्यांनीही त्यांबद्दल वेळोवेळीं मध्यस्थी करून, उभयतांचा सलोखा करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांत त्यांस यश आलें नाहीं. महाराज जनकोजीराव ह्यांच्याबद्दल ग्वाल्हेरचे रेसिडेंट व दुसरे युरोपियन लोक ह्यांनीं जे लेख लिहिले आहेत, त्यांवरून त्यांच्याविषयीं व त्यांच्या वर्तनाविषयीं अनुकूल ग्रह होत नाहीं.

 इ. स. १८२९ च्या जानेवारी महिन्यांत हिंदुस्थानचे मुख्य सेनाधिपति लॉर्ड कोंबरमियर हे ग्वाल्हेर येथील सैन्याची पहाणी करण्याकरितां आले होते. त्या वेळी त्यांची व महाराज जनकोजीराव ह्यांची मुलाखत होऊन, महाराज जनकोजीराव ह्यांच्यासंबंधानें त्यांचा जो ग्रह झाला, तो त्यांचे एडीकां (परिचारक) मेजर आर्चर ह्यांनी आपल्या प्रवासवृत्तांत नोंदून ठेविला आहे. त्यांत त्यांनी असे लिहिले आहे की, "राजेसाहेब हे अगदी बालवयी ह्मणजे अवघे १४ वर्षांचे