पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/111

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८७

कीं, "महाराज, भगवानानें तुह्मांस तुमच्या निकृष्ट स्थितींतून एवढ्या ऐश्वर्यपदावर आणून ठेविलें, हे तुमच्यावर मोठे उपकार केले आहेत. ते दुसऱ्यास अपकार करण्याकरितां नव्हेत ! तुह्मी जर अशा रीतीनें वागूं लागला, तर तुमच्याविषयीं सर्व लोकांचे मत फार वाईट होईल व तुह्मांस कोणी चांगले ह्मणणार नाहीं." ह्यावर त्यांनी उत्तर दिलें कीं, "मीं आतां ते सर्व सोडून दिले आहे !" अर्थात् तशा प्रकारचें सर्व वर्तन महाराजांनीं सोडून दिले, असा महाराजांच्या शब्दाचा अर्थ माझ्या मनांत येऊन, मी त्यांस ह्मटलें की, "ही फार आनंदाची गोष्ट आहे." परंतु महाराजांनी माझा हा चुकीचा समज फार वेळ राहूं दिला नाहीं ! त्यांनी लगेच स्पष्ट करून सांगितले की, "तुह्मी समजलां तसा माझ्या शब्दांचा अर्थ नाहीं. माझा अर्थ असा कीं, मीं लोकमताकडे लक्ष्य देण्याचें मुळींच सोडून दिले आहे. मला कोणाचीच जरूर नाहीं !"

 हा मेजर स्टुअर्ट ह्यांच्या खलिता वाचून महाराज जनकोजीराव ह्यांचें वर्तन कोणाही सुज्ञ मनुष्यास चांगले वाटणार नाहीं

 मेजर स्टुअर्ट ह्यांची इ. स. १८३० सालीं ग्वाल्हेरीहून बदली झाली. त्या वेळीं त्यांनीं ग्वाल्हेर सोडण्यापूर्वी पुनः महाराजांची भेट घेतली व त्यांची कशी काय स्थिति आहे हें विचारिलें. त्या वेळी त्यांनी स्पष्ट सांगितले की, "मी पूर्ण सुखी आहें." ह्या प्रसंगी मेजर स्टुअर्ट ह्यांनी महाराजांस चांगला उपदेश केला, व संस्थानचें राजकीय कामकाज चाललें असतांना बाईसाहेबांजवळ हजर राहणें किती हितावह आहे, तेंही सांगितलें. त्या वेळीं महाराजांनीं, "माझी तबियत बरी असते, तेव्हां बाईसाहेबांजवळ मी हजर असतों." असें उत्तर दिलें. ह्या सर्व संभाषणाचा सारांश मेजर स्टुअर्ट ह्यांनी शेवटी एका वाक्यांत असा काढिला आहे कीं, "एकंदरींत महाराजांनीं मजवर यत्किंचितही विश्वास न दाखवितां, किंवा आपली दुःखें मला न कळवितां, माझ्या