पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/115

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९१



हात घालण्याची अवश्यकता वाटली नाहीं. मेजर स्टुअर्ट ह्यांची हैदराबादच्या रेसिडेंटाच्या जागीं इ. स. १८३० सालीं नेमणूक झाली. त्यांचे जागीं मि. क्याव्हेंडिश हे ग्वाल्हेर दरबारचे नवे रेसिडेंट होऊन आले. ह्यांचेंही बायजाबाईसाहेबांविषयीं प्रथम मन कलुषित झालेलें नव्हतें. त्यांना ग्वाल्हेरची राज्यव्यवस्था पसंत असून त्यांनी बाईसाहेबांचें अनेक वेळां अभिनंदन केलें. परंतु पुढें, महाराज जनकोजीराव हे जसजसे मोठे होऊं लागले, तसतसें त्यांच्या पक्षास अधिक प्राबल्य येऊन हा कलह पेट घेत चालला. ह्याच वेळीं ब्रिटिश सरकाराने बायजाबाईसाहेब ह्यांस स्वतःचा शिक्का बंद करून महाराजांचा शिक्का चालविण्याचा आग्रह केला, व महाराजांचे सर्व प्रतिबंध कमी करून त्यांचें व ब्रिटिश रेसिडेंटाचें दळणवळण अधिक मोकळेपणाचें केलें. त्यामुळें महाराजांच्या पक्षांतील लोकांस चांगली फूस सांपडून, त्यांनी महाराज व त्यांच्या मातुश्री ह्यांच्या तंट्याचे स्वरूप अधिक उग्र व भयानक केलें. त्यामुळें नवीन रेसिडेंट मि. क्याव्हेंडिश ह्यांस हें भांडण हिंदुस्थानचे गव्हरनर जनरल लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांच्यापुढें मांडणें भाग पडलें. लॉर्ड वुइल्यम बेंटिंक ह्यांनी राजकारणाच्या हेतूनें ह्मणा, किंवा वस्तुस्थितीचें समक्ष ज्ञान करून घेण्याकरितां ह्मणा, ग्वाल्हेर येथें स्वतः येऊन, बायजाबाईसाहेब व जनकोजीराव ह्यांची भेट घेण्याचा निश्चय केला;व त्याप्रमाणें त्यांची स्वारी आपल्या पत्नीसहवर्तमान ग्वाल्हेर येथें ता. १८ डिसेंबर इ. स. १८३२ रोजीं येऊन दाखल झाली. खुद्द गव्हरनर जनरलसाहेब ह्यांची स्वारी ग्वाल्हेर येथें येणार असे समजतांच बायजाबाईसाहेब ह्यांस फार संतोष झाला, व त्यांनी त्यांच्या स्वागताची उत्तम प्रकारची तयारी केली. बायजाबाईसाहेब ह्यांची व लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांची जी भेट झाली, तिचें सुंदर वर्णन त्या वेळी हजर असलेल्या एका युरोपियन गृहस्थानें लिहिले आहे. तेंच येथें सादर केलें ह्मणजे