पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/116

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२

त्या प्रसंगाचा हुबेहूब देखावा नेत्रांपुढें येऊन, बायजाबाईसाहेबांचे ऐश्वर्य व संपत्ति ह्यांचीही कल्पना करितां येईल. हें वर्णन पुढें लिहिल्याप्रमाणें आहेः-

 "बियाना, डिसेंबर २० इ. स. १८३२– गव्हरनर जनरलसाहेब ग्वाल्हेरच्या महाराजांस परत भेट देण्यास गेले, त्या वेळीं महाराणी बायजाबाई आणि महाराज जनकोजीराव शिंदे हे नामदारसाहेबांस भेटण्याकरितां धोलपुरापर्यंत आले होते. त्या वेळीं त्यांचेबरोबर सर्व प्रकारचें सैन्य मिळून ३०,००० लोक होते. ह्या सैन्याचा तळ ग्वाल्हेरच्या सरहद्दीवर चंबळा नदीचे कांठीं पडला होता. आग्र्याच्या सरहद्दीवरील प्रांत, दोन किंवा तीन मैलपर्यंत, विपुल जलानें परिप्लुत झाल्यामुळें, आह्मांस त्या पलीकडे तळ देणें भाग पडलें होतें. मराठ्यांच्या लष्करापासून आमचा तळ लांब असल्यामुळें, व नामदार गव्हरनर जनरल ह्यांनी दुपारी तीन वाजतां कूच केल्यामुळें, मराठ्यांच्या लष्कराचा भव्य देखावा अवलोकन करण्यास मला संधि मिळाली नाहीं. ह्या समयीं मराठ्यांचे सैन्य नामदारसाहेबांच्या सन्मानार्थ लष्करी थाटानें जितकें सज्ज होतें, तितकें क्वचितच दृष्टीस पडेल. ह्या लष्कराच्या तळापासून नदीच्या काठापर्यंत जाण्याचा जो रस्ता होता, तो फारच अरुंद होता. नदीच्या तीरावरील उच्चप्रदेशावर पायदळ पलटणींचे लोक हातामध्यें तरवारी व तोड्यांच्या बंदुकी घेऊन दोन मैलपर्यंत एकसारखे उभे राहिले होते. त्यांच्याकडून नदीच्या बाजूस खाली उतरत आलें आणि थोडें वळलें, ह्मणजे नीलवर्ण व स्वच्छ अशा चंबळा नदीच्या तीरावर, फारच सुंदर देखावा दृष्टीस पडत असे. तेथें १५ हजार सैन्याची दुतर्फा रांग लागलेली असून त्यांच्या पिच्छाडीस घोडेस्वारांच्या तरवारी चमकत होत्या. हे सर्व लोक नामदारसाहेबांस सलामी देण्याकरितां अगदीं तत्पर झाले होते. हा देखावा