पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/117

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९३

फारच भव्य व अदृष्टपूर्व असा होता. रीतीप्रमाणें गव्हरनर जनरलसाहेबांच्या दरबारचा समारंभ झाला. महाराज जनकोजीराव हे शृंगारलेल्या हत्तीवर सोन्याच्या अंबारींत बसून गव्हरनर जनरलसाहेबांस अर्ध्या रस्त्यावर सामोरे आले होते. उभयतांची मुलाखत होतांच बंदुकीची फेर झडली. नंतर परस्परांचे मुजरे होऊन नामदारसाहेब आपल्या हत्तीवरून शिंदे सरकारच्या हत्तीवर आले. नंतर उभयतांच्या स्वाऱ्या दरबारच्या भव्य तंबूमध्यें दाखल झाल्या. हा तंबू ह्या प्रसंगाकरितां उत्तमप्रकारें शृंगारलेला होता. महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांची व नामदारसाहेबांची भेट तंबूमध्ये चिकाचा पडदा लावून झाली. त्यांस नामदारसाहेबांनी मोठ्या आदबीनें सलाम केला. नंतर त्यांचें व बायजाबाईसाहेबांचे, मि. म्याक्नॉटन ह्यांच्या मध्यस्थीनें, कांहीं वेळ संभाषण झालें. रीतीप्रमाणें नजरनजराणे, पानसुपारी व अत्तरगुलाब होऊन दरबार बरखास्त झाला.

 दुसरे दिवशीं सकाळीं मराठ्यांचें सैन्य ग्वाल्हेरीकडे परत वळलें, व ना. गव्हरनर जनरल ह्यांची स्वारी एक दिवसानंतर–ह्मणजे ता. २१ डिसेंबर रोजीं कूच करिती झाली. त्यानंतर तोफखाना परत निघाला. चंबळा नदीचे ग्वाल्हेरच्या बाजूचे ओहोळ हे आग्र्याच्या बाजूपेक्षां अधिक बिकट असल्यामुळें त्यांतून सुरक्षितपणें तोफा नेणें जवळजवळ अशक्य होतें; ह्मणून ता. २१ रोजी सर्व सैन्य पुढें पाठवून, तोफखाना स्वतंत्र रीतीनें न्यावा, असा विचार ठरला. आह्मी आल्यानंतर दुसरे दिवशीं महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांनीं लेडी उइल्यम बेंटिंक ह्यांची भेट घेतली. एतद्देशीय स्त्रियांनी युरोपियन स्त्रियांची भेट घेण्याची फारशी चाल नाहीं. परंतु बायजाबाईनीं लेडी उइल्यम बेंटिंक ह्यांची मुलाखत व्हावी अशी इच्छा व्यक्त केल्यामुळें तो योग घडून आला. प्रथमतः बायजाबाईसाहेब ह्यांनी रीतीप्रमाणें त्यांना पेशवाईची भेट