पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/120

हे पान प्रमाणित केलेले आहे.
९६



पाहून आंग्ल स्त्रियांनी तिच्या रूपाप्रमाणें ह्याही सद्गुणांची फार तारीफ केली. चिमणाबाईनें आपल्या मातुश्रींच्या वतीनें, मोठ्या प्रौढपणानें आणि चित्ताकर्षक रीतीनें, सर्वांचा आदरसत्कार व मानपान यथायोग्य केला. ह्या प्रसंगीं बायजाबाईसाहेबांनीं लेडी उइल्यम व आंग्ल स्त्रिया ह्यांना पुष्कळ मूल्यवान् वस्तू नजर केल्या. त्या सर्वांची माहिती चिमणाबाईनें आंग्ल स्त्रियांस विनम्र व गोड वाणीनें सादर केली. त्यामुळें त्या स्त्रिया अत्यंत प्रसन्न झाल्या, हें सांगावयास नकोच."

 गव्हरनर जनरलसाहेबांनीं महाराज जनकोजीराव ह्यांस परत भेट दिली; त्याचप्रमाणें बायजाबाईसाहेब ह्यांसही परत भेट दिली. बायजाबाईसाहेबांनीं रीतीप्रमाणें चिकाच्या पडद्यांतून नामदारसाहेबांची भेट घेतली. त्या वेळीं हिंदुराव घाटगे हे मराठी तऱ्हेचा बाणेदार पोषाख करून व बहुमूल्य रत्नालंकार धारण करून, नामदारसाहेबांच्या सत्कारार्थ तत्पर होते. बायजाबाईसाहेबांचें व नामदारसाहेबांचें राजकीय प्रकरणीं वगैरे बराच वेळ संभाषण झालें. नंतर त्यांनी आदबीनें सलाम करून बायजाबाईसाहेबांचा निरोप घेतला.

 गव्हरनर जनरल लॉर्ड उइल्यम बेंटिंक आणि महाराज जनकोजीराव शिंदे ह्यांची ज्या वेळीं भेट झाली, त्या वेळीं चीफ सेक्रेटरी मि. म्याक्नॉटन, ग्वाल्हेरचे रेसिडेंट मि. क्याव्हेंडिश आणि लखनौचे रेसिडेंट मेजर जॉन लो हे हजर होते. ह्या भेटीमध्यें जे संभाषण झालें, त्याचा सारांश ता. १८ डिसेंबर १८३२ च्या एका खलित्यामध्यें आला आहे. तो संक्षिप्त रीतीनें येथे दाखल करितोंः-

 "गव्हरनर जनरलसाहेबांनी महाराजांस असें सांगितलें कीं, ज्याअर्थीं उभय सरकारांमध्ये स्नेहभाव वसत आहे, त्या अर्थीं महाराजांनीं मजवर पूर्ण विश्वास ठेवावा, व माझी काय मदत पाहिजे तें मला मोकळ्या अंतःकरणाने कळवावे. महाराजांनीं गव्हरनर जनरलसाहेबांच्या