पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/123

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९९



वावा व महाराजांनी त्यांच्या आज्ञेत राहावे, असा हिंदुस्थान सरकारचा हेतु स्पष्ट रीतीनें व्यक्त होतो. परंतु ह्याप्रमाणें महाराजांच्या हातून वर्तन घडले नाहीं. त्यांनी पुनः आपल्या कुटिल मंत्र्यांच्या नादीं लागून, त्यांच्या मसलतीप्रमाणें बायजाबाईंच्या विरुद्ध कट उभारिला, आणि त्यांच्याविरुद्ध नानाप्रकारच्या कागाळ्या ग्वाल्हेरचे रेसिडेंट मि. क्याव्हेंडिश ह्यांचेमार्फत गव्हरनरजनरलसाहेबांकडे पाठविण्यास सुरवात केली. मि. क्याव्हेंडिश ह्यांचें मत महाराजांच्या विरुद्ध असून, त्यांना महाराजांच्या ह्या कृती पसंत होत्या, असें दिसत नाहीं. ता. २८ मार्च इ. स. १८३३ रोजीं, त्यांनीं महाराजांस जो खलिता पाठविला आहे, त्यांत त्यांनीं त्यांची कानउघाडणी करून गव्हरनरजनरलसाहेबांच्या उपदेशाची त्यांना पुनः आठवण दिली आहे. एवढेच नव्हे, तर "बायजाबाई ह्या सर्व राज्याच्या मालक आहेत व इंग्रजांस त्यांच्या राज्यकारभारांत हात घालण्याचा अधिकार पोहोंचत नाहीं. ह्याकरितां माझी तुह्मांस अशी शिफारस आहे कीं, तुह्मीं गव्हरनरजनरलसाहेबांच्या उपदेशांप्रमाणें व तुमच्या स्वतःच्या वचनाप्रमाणें वर्तन ठेवून, तुह्मीं बायजाबाईंच्या आज्ञेंत वागावें व कांहीं तंटेबखेडे करूं नयेत. असा वर्तनक्रम तुह्मी स्वीकाराल, तर ब्रिटिश अधिकाऱ्यांस संतोष वाटेल; आणि जर तुह्मी दंगेधोपे कराल, तर- तुमची सध्याची स्थिति कांहींही असो-तुह्मी अधिक प्रतिबंधांत पडाल; आणि त्यांतून तुमची सुटका होणें अधिक कठीण पडेल. मग ब्रिटिश सरकार किंवा मी तुमच्या वतीनें त्यांत बिलकूल लक्ष्य घालणार नाहीं. ........ तुह्मांस जर कांहीं महत्त्वाची गोष्ट कळवावयाची असेल व ती जर गव्हरनर जनरल ह्यांस अद्यापि कळविली गेली नसेल, तर प्रथम मी ती बायजाबाईंस कळवीन; व त्यांचा त्यासंबंधाचा अभिप्राय घेऊन, नंतर तुमचा खलिता पुढें रवाना करीन. कोणत्याही कारणास्तव, तुमचा खलिता किंवा खाजगी