पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/128

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४

ह्यांनीं महाराजांच्या चळवळीची गुप्त बातमी ठेविली होती. त्यांना महाराज राजवाड्यांतून पसार झाल्याचे वृत्त समजतांच, त्यांनी बायजाबाईसाहेबांवर अरिष्ट येणार असें मनांत आणून त्यांस सूचना केली. त्या वेळीं बायजाबाईसाहेब ह्या बाळाबाईच्या महालांत बसल्या होत्या. त्यांस इशारत पोहोंचतांच त्या, राजवाड्यासभोंवतालच्या सर्व सैन्याची गाफिलगिरी लक्ष्यांत घेऊन, अतिशय गुप्त रीतीनें हिंदुरावांच्या वाड्यांत निघून गेल्या. नंतर त्यांनी निरनिराळ्या सरदार लोकांस हजर होण्याबद्दल हुकूम पाठविले; परंतु कर्नल आलेक्झांडर ह्याच्याशिवाय तेथें एकही सरदार आला नाहीं. नंतर त्या, हिंदुराव घाटगे, आपासाहेब पाटणकर आणि आलेक्झांडरचे ७०० शिपाई ह्यांस बरोबर घेऊन मेण्यांत बसून रेसिडेन्सीकडे गेल्या. त्या वेळीं सर्व रस्त्यांची नाकेबंदी फितुर झालेल्या सैन्यानें केली होती, आणि बायजाबाईंस पकडण्याकरितां चार पलटणी आणि पंचवीस तोफा तयार करून ठेवल्या होत्या. एवढ्या मोठ्या सैन्याची दृष्टि चुकवून आपला बचाव करणें फार कठीण काम होतें. परंतु बाईसाहेबांनीं मोठ्या युक्तीनें विरुद्ध पक्षाच्या हातावर तुरी देऊन आपलें संरक्षण केलें, ही फार प्रशंसनीय गोष्ट आहे. सर्व सैन्य खवळलेलें असतांना व शत्रुवर्ग आपणांस कैद करण्यास टपला असतांना त्यांच्या तावडींतून निसटून जाणें हें कृत्य सामान्य नव्हे.

 बायजाबाईसाहेबांनीं रेसिडेंटांकडे अगोदर आपला हलकारा पाठवून आपल्या भेटीस येण्याचा उद्देश त्यांस कळविला; व सैन्याची सर्व स्थितिही जाहीर केली. रेसिडेंट मि. क्याव्हेंडिश ह्यांनीं बायजाबाईंचा निरोप पोहोंचतांच, आपले असिस्टंट क्याप्टन रॉस ह्यांस महाराजांकडे पाठवून, फितुर झालेल्या सैन्यास आंवरून धरण्याबद्दल व बायजाबाईंस रेसिडेन्सीमध्यें येण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा न करण्याबद्दल ताकीद केली. बायजाबाईंस सुरक्षितपणे रेसि-