पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/130

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६

सिंहासनारूढ करून त्यांच्या नांवाने द्वाही फिरविली. व बायजाबाई ह्यांस प्रतिबंधांत ठेवून त्यांना ग्वाल्हेरच्या सरहद्दीबाहेर पाठविण्याचा निश्चय केला.

 बायजाबाई रेसिडेन्सीमध्ये गेल्या व त्यांनीं रेसिडेंट मि. क्याव्हेंडिश ह्यांची भेट घेतली. परंतु त्यांस तेथील सर्व प्रकार एकदम विलक्षण दिसून आला. आजपर्यंतचा बायजाबाईंचा व ब्रिटिश सरकारचा संबंध फार स्नेहभावाचा असून, हरएक बाबतींत ब्रिटिश रेसिडेंट ह्यांनीं बायजाबाईंचा पक्ष घेऊन त्यांस साहाय्य केलें होतें. त्याप्रमाणें पाहिलें असतां, ब्रिटिश रेसिडेंटानें ह्या आणीबाणीच्या प्रसंगी बायजाबाईंचा पक्ष घेऊन त्यांस मदत करणें योग्य होतें. परंतु तसा कांहींच प्रकार न होतां, रेसिडेंटांनीं बायजाबाईंस ग्वाल्हेरच्या गादीवर तुळसीपत्र ठेवून गंगातीरीं हरी हरी करीत बसण्याचा उपदेश करावा, व ज्या तरुण व अविवेकी महाराजांच्या कृती ब्रिटिश रेसिडेंटांस कधींही रुचल्या नव्हत्या, त्यांस एकदम गादीवर बसविण्यास त्यांची मनोदेवता प्रसन्न व्हावी, हा काय अपूर्व चमत्कार आहे हें सांगता येत नाहीं. हिंदुस्थान सरकारांनी हा वेळपर्यंत बायजाबाईसाहेब जें करतील तें प्रमाण समजून तटस्थ वृत्ति धारण केली होती; व ग्वाल्हेर संस्थानच्या राजकारणांत हात घालावयाचा नाहीं असा त्यांचा निश्चय होता. परंतु त्यांची ही तटस्थ वृत्ति (जीस इंग्रजीमध्यें Non-interference Policy ह्मणतात ती) एकदम बदलण्याचें काय प्रयोजन झालें असावें तें समजत नाहीं. तात्पर्य, ग्वाल्हेर येथें तरुण महाराजांच्या फुसलावणीनें जे बंड झालें, त्याचा परिणाम राज्यक्रांति हा होऊन, महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांस राज्याधिकारास मुकावें लागलें; व महाराज जनकोजीराव शिंदे ह्यांच्या इच्छेप्रमाणें त्यांस गादी मिळाली. ह्या राज्यक्रांतीमध्यें आंग्ल राजनीतीचें स्वरूप एकदम कां बदललें, हे ऐंद्रजालिक गूढ