पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/134

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०



बाईसाहेब ही ता. १४ आक्टोबर इ. स. १८३३ रोजी बाळंत होऊन मृत्यु पावली. तिच्या मृत्यूनें बायजाबाईवर दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखें झालें. ही मुलगी फार सुस्वरूप व सुस्वभावी अशी होती. बायजाबाईंची हिजवर अत्यंत प्रीति असून, ती केवळ त्यांना जीव कीं प्राण वाटत असे. अशा मुलीच्या मृत्यूनें त्यांची स्थिति अतिशय करुणास्पद व हृदयद्रावक व्हावी हें साहजिक आहे. स्वातंत्र्यहीन व राज्यहीन होऊन त्यांत आणखी प्रियकर अपत्याचा विरह व्हावा, ह्यापेक्षां अधिक दुःखाची गोष्ट कोणती आहे ? दुर्दैवानें दुःखपरंपरा सुरू झाली ह्मणजे ती मनुष्याचा कसा छल करिते, ह्याचें उदाहरण ह्या अभागी राजस्त्रीच्या अनुभवावरून घेण्यासारखें आहे. कवि मोरोपंत ह्यांनी एके ठिकाणीं ह्मटलें आहे :-

आर्या.
अनुकूल दैव असतां न समर्थ करावयास हानि यम ।
होतां तें प्रतिकूल प्रबलहि दुर्बलचि होय हा नियम ॥

हें अक्षरशः खरें आहे.

 बायजाबाईसाहेबांनीं आग्र्याहून ब्रिटिश रेसिडेंट व हिंदुस्थान सरकार ह्यांना आपली दुःखें कळवून, त्यांनी राज्याधिकार परत द्यावा अशाबद्दल वारंवार खलिते पाठविले; परंतु त्यांचा कांहीं उपयोग झाला नाहीं. उलट, त्यांचे आग्र्यास राहणें ग्वाल्हेरच्या सरहद्दीनजीक असल्यामुळें त्यांच्या गुप्त कटानें ग्वाल्हेर संस्थानास अपाय पोहोंचेल, ह्मणून त्यांची रवानगी आग्र्यापासून दूर अशा फत्तेगड गांवीं केली. व त्याप्रमाणें त्यांस कांहीं दिवस फत्तेगड ऊर्फ फरुकाबाद येथें एका निळीच्या कारखान्यामध्यें राहण्याचा प्रसंग आला. त्यावेळच्या त्यांच्या स्थितीबद्दल 'दिल्ली गॅझेट' 'मुफसल आखबार' वगैरे पत्रांत जे लेख प्रसिद्ध झाले आहेत, त्यांत त्यांची शोचनीय स्थिति व हालअपेष्टा ह्यांचे वर्णन